सावधान! तरुण पिढी आणि लहान शहरांतील रुग्णांना यकृताच्या आजारांनी ग्रासले
केअर हेल्थ इन्शुअरन्सच्या दाव्यांतून धक्कादायक माहिती उघडकीस
· गेल्या तीन वर्षांत यकृताच्या आजारांशी संबंधित आरोग्यविषयक दाव्यांमध्ये १०० टक्क्यांची वाढ झाली आहे.
· यकृताचे आजार जडणा-या रुग्णांच्या संख्येत ५-१० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
· टियर २ आणि टियर ३ या निमशहरी लहान शहरांमध्ये दरवर्षाला १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद.
· यकृताचे आजार हे प्रामुख्याने पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात, परंतु महिलांमध्ये याचे प्रमाण दरवर्षी सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे.
MUMBAI (NHI@24.COM)सध्या भारतीयांमध्ये यकृत विकाराचे प्रमाण वाढू लागले आहे. ही समस्या गंभीर स्वरुप धारण करत असून, दुर्देवाने अनेकांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ९ टक्के ते ३२ टक्के लोकसंख्या ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लीव्हर डिसीज’ने ग्रस्त आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, तीनपैकी एका भारतीयाला या आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजाराला ‘छुप्या साथीचा रोग’ म्हणून संबोधले जात आहे. वाढत्या यकृताच्या आजारांत आता मृत्यूची आकडेवारी वाढत असून, या आजारामुळे ६६ टक्क्यांहून अधिक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या आजारामुळे मोठा आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. केंद्र सरकारने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधत आणि नियंत्रण कार्यक्रमामध्ये यकृताच्या आजारांचा तपासणीचा समावेश केला आहे. मात्र या सरकारी प्रयत्नांना वैयक्तिक पातळीवर आर्थिक नियोजनाची साथ मिळणे आवश्यक आहे.
‘जागतिक यकृत दिना’निमित्ताने केअर हेल्थ इन्शुअरन्सने या आजाराशी झगडणारी व्यक्ती आणि कुटुंब या दोन्ही स्तरांवर संपूर्ण बाबींवर प्रकाश टाकणारी माहिती जाहीर केली आहे. या माहितीतून दोन्ही स्तरांतील यकृताचे वाढते आव्हान अधोरेखित आहे. या विश्लेषणानुसार, गेल्या तीन वर्षांत यकृताशी संबंधित उपचारांचा विम्यावरील दाव्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उपचारांची गुंतागुंत आणि रुग्णांचा विस्तार चाललेला वयोगट व भौगोलिक व्याप्ती ही यामागील प्रमुख कारणे आहेत. आज यकृताच्या आजारांवरील उपचारांचा खर्च तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत १०० टक्क्यांनी वाढला आहे. विम्याच्या दाव्यांच्या अनुभवावरुन असे दिसून येते की, यकृताच्या आजारांवरील उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे पुरेशा आर्थिक संरक्षणासाठी आता किमान १५ लाख किंवा त्याहून अधिक रक्कमेचे विमा कवच असणे ही काळाची गरज बनली आहे.
केअर हेल्थ इन्शुअरन्सच्या आकडेवारीनुसार, यकृताचे आजार आता केवळ वयस्कर व्यक्ती, पुरुष किंवा मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याचा विस्तार सर्वच स्तरांत होत असल्याचे दिसून येते. प्राप्त माहितीनुसार, तरुण विमाधारकांमध्ये यकृताच्या आजारांचे प्रमाण दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी वाढत आहे, तर निमशहरी आणि ग्रामीण भागातून येणा-या विम्याच्या दाव्यांमध्ये १० ते १५ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, महिला विमाधारकांच्या दाव्यांमध्येही दरवर्षी सुमारे १० टक्क्यांनी वाढ होत आहे. हा बदला कल हेच दर्शवतो की, वयोगट, लिंग किंवा भौगोलिक सीमा ओलांडून यकृताचे विकार आता कोणालाही ग्रासू शकतात, त्यामुळे या आजारांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन बदलणे आणि अधिक सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.
केअर हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष डोडेजा म्हणाले, “यकृताचे आजार आता केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत राहिलेले नसून, त्यांचा विस्तार अतिशय चिंताजनक पद्धतीने होत आहे. रुग्णांचे स्वरुप आणि आजाराची तीव्रता या दोन्हींमध्ये आम्हांला स्पष्ट बदल दिसून येत आहेत. या आजारांच्या
केसेस वेगाने वाढत आहेत, तरुण पिढीला याचा मोठा फटका बसत आहे. कुटुंबांवर येणारा आर्थिक भार लक्षणीयरित्या वाढू लागला आहे. ही केवळ वैद्यकीय समस्या नसून, आर्थिक समस्यादेखील बनली आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी आपल्या आरोग्य विम्याचा आढावा घ्यावा. वाढत्या जोखीमेनुसार विमा संरक्षणाची रक्कम वाढवणेही आवश्यक आहे. आजाराबाबतची जागरुकता, वेळेत निदान आणि आर्थिक पुर्वतयारी यांची सांगड घातली जात नसल्यास, आरोग्यविषयक जोखीम आणि प्रतिबंधात्मक पूर्वतयारी यांमधील दरी वाढत राहील.”
या निरीक्षणांची पुष्टी व्यापक वैद्यकीय आणि रोगनिदानविषयक निष्कर्षांवरुनही होते. ‘इंडियन पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टोरोलॉजी’च्या मानांकनावर आधारित अलीकडील वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वात याबद्दल दर्शवण्यात आली आहे. मुलांमधील जुनाट यकृत विकारांचे फॅटी लिव्हर हे एक प्रमुख कारण असल्याचे अनेक वैद्यकीय चाचण्यांतून निष्पन्न झाले आहे. स्थूलता आणि चयापयाच्या समस्येने ग्रासलेल्या मुलांना हा त्रास प्रामुख्याने जाणवत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. ‘वर्ल्ड ओबेसिटी ऑब्झर्व्हेटरी’च्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास, २०४०पर्यंत भारतातील सुमारे १.१९ कोटी मुले यकृताच्या आजाराने ग्रस्त असू शकतात. हे आकडे जीवनशैली आणि आहारातील चुकीच्या सवयींमुळे सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये वाढत असलेल्या आरोग्यविषयक चिंता दर्शवतात.




