सेमिकॉन 2.0चे आयईएसएकडून स्वागत : विश्वासार्ह, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सेमीकंडक्टर इकोसिस्टिम उभारण्याच्या दिशेने परिवर्तनकारी पाऊल
ISA welcomes Semicon 2.0
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 18/07/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांचे इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशनने (आयईएसए) स्वागत केले आहे. या निर्णयानुसार पायाभूत सुविधा आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी एकूण ₹2,19,353 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन उपक्रमांचा समावेश आहे. यामध्ये भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी महत्त्वाच्या दोन घोषणांचा समावेश आहे. सेमिकॉन 2.0साठी ₹1,27,500 कोटींची तरतूद करण्यात आली असून, मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीमसाठी (एमपीएमएस) पुढील पाच वर्षांसाठी ₹62,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झालेल्या भक्कम पायावर आणि वेगावर आधारित हा कार्यक्रम सरकारच्या दीर्घकालीन धोरणात्मक पाठबळाची पुनर्प्रतिबद्धता अधोरेखित करतो. तसेच, सेमीकंडक्टर उत्पादन क्षमता उभारण्यापासून पुढे जात फॅब्स, प्रगत पॅकेजिंग, डिझाइन, संशोधन व विकास, कौशल्यविकास, यंत्रसामग्री (उपकरणे), मटेरिअल आणि पुरवठा साखळी यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सेमीकंडक्टर इकोसिस्टिम उभारण्याच्या भारताच्या प्रवासालाही या कार्यक्रमामुळे चालना मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात भारताने 20 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक प्रस्तावित सेमीकंडक्टर गुंतवणूक आकर्षित करून आपली विश्वासार्हता सिद्ध केली असून, अनेक फॅब आणि एटीएमपी/ओसॅट प्रकल्पांना गती मिळाली आहे. अनेक ओसॅट प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असून ते उत्पादनाच्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर फॅब्सवर अधिक भर देण्यात आला आहे. त्याचवेळी प्रगत पॅकेजिंगसाठीही भक्कम पाठबळ कायम ठेवण्यात आले असून, यामुळे संतुलित आणि भविष्यासाठी सज्ज अशी सेमीकंडक्टर इकोसिस्टिम विकसित होण्यास मदत होणार आहे.
आयईएसए आणि सेमी इंडियाचे प्रेसिडेंट अशोक चांडक म्हणाले, “सेमिकॉन 2.0 हा भारताच्या धोरण आखण्यापासून ते मोठ्या प्रमाणावर प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रवासातील निर्णायक टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामुळे भारताची विश्वासार्हता सिद्ध झाली, तर दुसऱ्या टप्प्यामुळे दीर्घकालीन क्षमता निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. फॅब्स, प्रगत पॅकेजिंग, डिझाइन, संशोधन व विकास, कौशल्यविकास आणि सेमीकंडक्टर पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्यावर सरकारने भर दिल्यामुळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक इकोसिस्टिम उभारण्यासाठी भक्कम पाया तयार होणार आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण गुंतवणूक आकर्षित होण्यास, उच्च मूल्याच्या रोजगारनिर्मितीस आणि देशांतर्गत मूल्यवर्धनात लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळणार आहे. जागतिक सेमीकंडक्टर उद्योग अभूतपूर्व गुंतवणूक चक्रात प्रवेश करत असताना सेमिकॉन इंडिया 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे. 2028 पर्यंत जगभरातील सेमीकंडक्टर उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीवरील खर्च जवळपास 230 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत या धोरणामुळे भारताला सेमीकंडक्टर उत्पादन, प्रगत पॅकेजिंग, यंत्रसामग्री आणि साहित्य या क्षेत्रांतील जागतिक गुंतवणुकीची पुढील लाट आकर्षित करण्यासाठी सक्षम स्थान मिळणार आहे.” असेही चांडक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मोबाइल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीमलाही (एमपीएमएस) मंजुरी देण्यात आली आहे. मोबाइल उत्पादन क्षेत्राला पुढील टप्प्यात नेण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली असून, एकूण उत्पादन जवळपास ₹39 लाख कोटींवर आणि एकूण निर्यात सुमारे ₹15 लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, 60,000 अतिरिक्त थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत सुमारे 125 कोटी मोबाईल फोनचे उत्पादन करून जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाईल उत्पादन इकोसिस्टिम म्हणून स्थान मिळवले आहे. तसेच, देशांतर्गत मागणीपैकी 99.2 टक्के मागणी आता ‘मेड इन इंडिया’ उपकरणांद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगती कायम ठेवण्यासाठी आवश्यक असलेले धोरणात्मक सातत्य आणि महत्त्वाकांक्षा या योजनेमुळे उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, देशांतर्गत स्रोतांमधून खरेदी तसेच भारतीय ब्रँड्सकडून डिझाइन आणि संशोधन व विकासाला देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे मूल्यवर्धन अधिक वाढण्यास आणि भारतीय बौद्धिक संपदेची भक्कम निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे.”
आयईएसएचे चेअरपर्सन नवीन बिश्नोई म्हणाले, “डिझाइन आणि संशोधन व विकास क्षेत्राला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यालाही या निर्णयांमुळे पुष्टी मिळाली आहे. स्वदेशी उत्पादन विकास, उद्योगांच्या नेतृत्वाखाली होणारे संशोधन व विकास आणि नावीन्य यावर अधिक भर देण्यात आल्यामुळे डिझाइन क्षेत्रातील अग्रणी देश म्हणून नव्हे, तर डिझाइनपासून उत्पादनापर्यंतची संपूर्ण क्षमता असलेल्या देशामध्ये भारताचे परिवर्तन होण्यास मदत मिळणार आहे. पूरक उपक्रमांसह सेमिकॉन इंडिया 2.0मुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरता अधिक बळकट होण्यास मदत मिळणार असून, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील जगातील सर्वाधिक विश्वासार्ह केंद्रांपैकी एक म्हणून भारताची ओळख अधिक दृढ होण्यासही मदत मिळणार आहे.”
या कार्यक्रमामुळे आणखी 40–50 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा असून उच्च कौशल्याधारित 2–3 लाख रोजगार निर्माण होण्यास, देशांतर्गत मूल्यवर्धनात लक्षणीय वाढ होण्यास आणि विश्वासार्ह जागतिक सेमीकंडक्टर भागीदार म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम (ईसीएमएस), प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय), इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स (ईएमसी 2.0) आणि विविध राज्य सरकारांचे पूरक उपक्रम यांच्या साहाय्याने सेमिकॉन 2.0 मुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील देशांतर्गत मूल्यवर्धन जवळपास 40% पर्यंत वाढण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासाला गती मिळण्याची क्षमता आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत मिळणार आहे.
सेमिकॉन 2.0चे प्रमुख धोरणात्मक आधारस्तंभ
- सेमीकंडक्टर फॅब्स आणि फाउंड्रीज
फॅब्सवर अधिक भर देण्यात आल्यामुळे भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन इकोसिस्टिमला भक्कम आधार मिळणार आहे. तसेच, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास आणि मोठ्या प्रमाणावर जागतिक गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत मिळणार आहे. भारतातील ओसॅट इकोसिस्टिमला गती मिळत असताना, फॅब्रिकेशन क्षमता वाढविणे हे संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्यसाखळी उभारण्यासाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची धोरणात्मक क्षमता अधिक बळकट करण्यासाठी पुढचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
- ओसॅट आणि प्रगत पॅकेजिंग
ओसॅट आणि प्रगत पॅकेजिंगसाठी सातत्याने पाठबळ देण्यात आल्यामुळे पहिल्या टप्प्यातील यश अधिक मजबूत होण्यास, उच्च मूल्याधारित उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती होण्यास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत असलेल्या प्रगत पॅकेजिंग, चिपलेट्स आणि हेटेरोजिनिअस इंटिग्रेशन तंत्रज्ञानासाठी भारताला पसंतीचे केंद्र म्हणून स्थान मिळण्यास मदत होणार आहे. प्रोत्साहनांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणारी कपात ही भारतातील ओसॅट उद्योग प्रोत्साहनाधारित वाढीच्या टप्प्यातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन इकोसिस्टिमकडे वाटचाल करत असल्याचे द्योतक आहे.
- गुणवत्ता विकास आणि कौशल्यप्रशिक्षण
सेमीकंडक्टर शिक्षण, विशेष प्रशिक्षण आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य यांवर राष्ट्रीय स्तरावर भर देण्यात आल्यामुळे 2 लाखांहून अधिक कुशल व्यावसायिक तयार होण्यास मदत मिळणार आहे. तसेच, 2030 पर्यंत जागतिक स्तरावर जवळपास 10 लाख सेमीकंडक्टर व्यावसायिकांची अपेक्षित मागणी लक्षात घेता, त्यामधील लक्षणीय वाटा मिळवण्यास भारत सक्षम होणार आहे. आयईएसएच्या मनुष्यबळ विकास उपक्रमांमुळे ते सेमीकंडक्टर मूल्यसाखळीतील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार होऊन या राष्ट्रीय उद्दिष्टाला पूरक ठरणार आहेत.
- डिझाइन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (डीएलआय) आणि उत्पादनातील नावीन्य
चिप डिझाइन, बौद्धिक संपदा (आयपी) निर्मिती आणि सेमीकंडक्टर स्टार्टअप्ससाठी वाढीव पाठबळ उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भारताचा केवळ डिझाइन सेवा केंद्रापासून जागतिक सेमीकंडक्टर उत्पादन नावीन्य केंद्राकडे होणारा प्रवास अधिक वेगाने पुढे सरकण्यास मदत मिळणार आहे. डीएलआय योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याची मर्यादा वाढविण्यात आल्यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक गुंतागुंतीचे चिप विकास कार्यक्रम हाती घेणे, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सेमीकंडक्टर उत्पादने विकसित करणे आणि मौल्यवान स्वदेशी बौद्धिक संपदा निर्माण करणे शक्य होणार असून, हा बदल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयईएसएचा स्टार्टअप मित्र उपक्रम उद्योग, मार्गदर्शक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान भागीदार यांच्याशी सेमीकंडक्टर स्टार्टअप्सना जोडून त्यांना सक्षम करत असून, डीएलआय कार्यक्रमाच्या बळकट उद्दिष्टांना पूरक ठरत आहे.
- संशोधन आणि विकास (आरअँडडी)
सेमीकंडक्टर क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्यात आल्यामुळे भारताचा डिझाइनपासून उत्पादनापर्यंतचा प्रवास दीर्घकालीन दृष्टीने शाश्वतता सुनिश्चित होणार आहे. शैक्षणिक संशोधनाला सातत्याने पाठबळ देण्याबरोबरच, उद्योगांच्या नेतृत्वाखाली आणि बाजारपेठेच्या गरजांनुसार होणाऱ्या संशोधन व विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण होण्यास, नावीन्याला गती मिळण्यास आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादने विकसित होण्यास चालना मिळणार आहे. आयईएसएने यासाठी इंडस्ट्री ड्रिव्हन सेमीकंडक्टर प्रॉडक्ट अँड सोल्युशन्स (आयडीएसपीएस) या विशेष उपक्रमाची सुरुवात केली असून, त्याद्वारे उद्योग प्रायोजित संशोधन व विकास, सहयोगातून नावीन्य आणि स्वदेशी उत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
- यंत्रसामग्री आणि मटेरिअल (उपकरण, पुरवठा साखळी)
सेमीकंडक्टरसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि उपघटक, विशेष रसायने, वायू, मटेरिअल, उपभोग्य वस्तू आणि अचूक अभियांत्रिकी यावर स्वतंत्रपणे भर देण्यात आल्यामुळे देशांतर्गत मूल्यवर्धन अधिक वाढण्यास, भारतीय एमएसएमईंसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होण्यास आणि जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीमध्ये भारताला विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे.
- एकात्मिक सेमीकंडक्टर इकोसिस्टिम
या सर्व उपक्रमांमुळे संशोधन व विकास, डिझाइन, उत्पादन, पॅकेजिंग, यंत्रसामग्री, मटेरिअल आणि कौशल्यविकास अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा समावेश असलेली सर्वसमावेशक सेमीकंडक्टर इकोसिस्टिम विकसित होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीमध्ये भारताचे स्थान अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून बळकट होणार आहे.
या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाबद्दल भारत सरकार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे (आयएसएम) अभिनंदन करताना आयईएसएचे व्हाइस चेअरपर्सन प्रदीप वज्रम म्हणाले, “सेमिकॉन इंडिया 2.0ची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इंडिया सेमीकंडक्टर मिशन, विविध राज्य सरकारे, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि जागतिक भागधारक यांच्यासोबत काम करण्यास आयईएसए उत्सुक आहे. मनुष्यबळ विकास, स्टार्टअप मित्र, संशोधन व विकास (आयडीएसपीएस), धोरणविषयक पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या क्षेत्रांतील सुरू असलेल्या उपक्रमांद्वारे भारताच्या तंत्रज्ञान नेतृत्वाच्या आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला पूरक ठरेल अशी सक्षम, नावीन्याधारित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सेमीकंडक्टर इकोसिस्टिम विकसित होण्यास गती मिळावी, यासाठी आयईएसए कटिबद्ध आहे.”
आयईएसएबद्दल
आयईएसए ही ईएसडीएम आणि इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील भारताची अग्रगण्य औद्योगिक संघटना आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तुनिर्माण आणि डिझाइन क्षेत्रात भारत हे जागतिक स्तरावरील आघाडीचे केंद्र म्हणून स्थापित व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टिम विकास कार्यक्रमाची सर्वसमावेशक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही विविध सरकारी मंत्रालये, उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांसोबत काम करतो. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले तंत्रज्ञान क्षेत्रातील आमची तज्ज्ञांची टीम 1.3 अब्ज भारतीयांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे.




