खेल

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत जेजे, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल उपांत्य फेरीत

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत जेजे, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल उपांत्य फेरीत

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 27/03/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटलने केईएम हॉस्पिटलचा ४ विकेटने तर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने सोमैया हॉस्पिटलचा ९ विकेटने पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली. जेजे हॉस्पिटलचा अर्धशतकवीर प्रकाश सोळंकी, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा कप्तान प्रदीप क्षीरसागर, सोमैया हॉस्पिटलचा अष्टपैलू प्रकाश पुजारी, केईएम हॉस्पिटलचा अष्टपैलू अभिजित घाडीगावकर यांनी सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, क्रीडाप्रेमी गणेश साळवे, अरुण माने आदींच्या उपस्थितीत देण्यात आला. रहेजा विरुध्द जेजे आणि लीलावती विरुध्द ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल यांच्यामध्ये शुक्रवारी उपांत्य लढती होतील.

शिवाजी पार्क येथील भारत खेळपट्टीवर जेजे हॉस्पिटल विरुध्द केईएम हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. सलामीवीर अभिजित घाडीगावकर (२९ चेंडूत ३० धावा), प्रीतेश सावंत (३१ चेंडूत २७ धावा) व सागर सोळंकी (३० चेंडूत २० धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केईएम हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ४ बाद १३८ धावसंख्या नोंदविली. सलामीवीर सुभाष शिवगणने (३४ चेंडूत ४० धावा) विजयी पाया भक्कम करूनही जेजे हॉस्पिटलची १६ व्या षटकाला ६ बाद ११३ धावा अशी घसरगुंडी अभिजित घाडीगावकर (२० धावांत ३ बळी) व प्रीतेश सावंत (२४ धावांत २ बळी) यांच्या गोलंदाजीने केली. परंतु प्रकाश सोळंकीने (३८ चेंडूत नाबाद ६५ धावा) ९ चौकारांच्या आतषबाजीने विजयश्री खेचून आणली. परिणामी जेजे हॉस्पिटलने १८ व्या षटकाला ६ बाद १३९ धावा फटकावून उपांत्यपूर्व फेरी जिंकली.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरु झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलविरुध्द सोमैया हॉस्पिटलला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय फायदेशीर ठरला नाही. अष्टपैलू प्रकाश पुजारी (२० चेंडूत २४ धावा) व दर्शन गुरव (३० चेंडूत २२ धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सोमैया हॉस्पिटलचा डाव १६.३ षटकात अवघ्या ९० धावांत गडगडला. सलामीवीर प्रदीप क्षीरसागर (३५ चेंडूत ४३ धावा) व रोहन महाडिक (२६ चेंडूत नाबाद ३९ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १०.४ षटकात १ बाद ९३ अशी विजयी धावसंख्या धावा साकारून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!