
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 12/05/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) प्रोफेसर ए.एस. छगला इंटर मेडिकल क्रिकेट स्पर्धेत जी.एस.मेडिकल कॉलेज-केइएम हॉस्पिटलने डी.वाय. पाटील डेंटल कॉलेजचा ५ विकेटने पराभव केला आणि विजेतेपदाला गवसणी घातली. सलामीवीर अभिजीत राठोड ( ७० धावा) व दिपेश कुमार (४२ धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांच्या भागीदारीमुळे जीएस मेडिकलचा विजय सुकर झाला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विख्यात भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील व प्रोफेसर आदिल छगला यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या अंतिम सामन्यात जी.एस.मेडिकल कॉलेज-केइएम हॉस्पिटल विरुध्द डी.वाय. पाटील डेंटल कॉलेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. फिरकी गोलंदाज श्रीराम फुलझालके (६ धावांत ३ बळी), निखील नावन्डकर (३१ धावांत ३ बळी) व आदित्य बभाले (३८ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे डी.वाय. पाटील डेंटल कॉलेजचा डाव ३०.४ षटकात १६५ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर आरव अडवाणी (३१ चेंडूत ३७ धावा), अष्टपैलू गौरव शेंडे (२६ चेंडूत २५ धावा) व प्रणव कुमार (३५ चेंडूत २३ धावा) यांनी छान फलंदाजी केली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सलामीवीर अभिजीत राठोड ( ६९ चेंडूत ७० धावा) व दिपेश कुमार ( ३९ चेंडूत ४२ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करून दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची विजयी भागीदारी केली. परिणामी जी.एस.मेडिकल कॉलेज-केइएम हॉस्पिटलने डी.वाय. पाटील डेंटल कॉलेज विरुध्द २६.१ षटकात ५ बाद १६९ धावा फटकावून शानदार विजेतेपद पटकाविले.




