Uncategorized

SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 09/10/2026 (8850212023) 📞

मुंबई (NHI24) : विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदींनी केले.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र,आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. यावेळी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, पात्र मतदारांची नावे तातडीने पुनर्नोंदणीत आणावीत, मतदारांना आक्षेप नोंदविण्याची पुरेशी संधी द्यावी तसेच मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता व घटनात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्याबरोबरच नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठविल्याचा उल्लेख करत, आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचीही इंडिया आघाडीने निषेध केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली. ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’

SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांच्या हक्कांचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

चौकट : मी राज्याची मंत्री, आमदार राहिलेली असताना माझ्या मुलांच्या मतदान ओळखपत्रात त्रुटी काढण्यात आली. मग सर्वसामान्यांचं काय? त्यामुळे मूळ मुद्दा हा SIR आणि वोट चोरीचा आहे. भाजपने ऍप तयार करून त्याचा एक्सेस तहसीलदार आणि इतरांना देण्यात आलाय. कोणती नावं डिलिट करावीत हे ठरवलं जात आहे. ज्ञानेश कुमार यांनी पूर्ण देशात गोंधळ घातलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय. तीही निषेधार्ह आहे. – यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या, माजी मंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!