महालक्ष्मी सरस आज महाराष्ट्रात महिलांच्या सशक्तीकरणाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास येत आहे.
हे प्रदर्शन १४ मे २०२६ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 01/05/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M): महालक्ष्मी सरस आज महाराष्ट्रात महिलांच्या सशक्तीकरणाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास येत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ सक्रिय आहेत, ज्यामुळे हा देशातील सर्वात मोठ्या कार्यरत महिला समूहांपैकी एक ठरतो. या महिला केवळ उद्योजिका नसून प्रत्यक्ष अर्थाने रोजगार निर्माण करणाऱ्या आहेत आणि त्या आपल्या कुटुंब व समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
उमेद अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस आता एका व्यापक जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे, जिथे महिलांना रोजगारासोबतच आत्मनिर्भरता, नेतृत्व आणि सामाजिक ओळख मिळत आहे. हा पुढाकार ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
उमेद अभियानाच्या यशाचा अंदाज यावरून येतो की आतापर्यंत महिलांना ५०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे. केवळ मागील वर्षातच १०,००० कोटी रुपयांचे कर्ज संभाव्य महिला उद्योजिकांना देण्यात आले. राज्यात ५० लाखापेक्षा जास्त लखपती दीदी निर्माण झालेल्या आहेत.
मुंबईत २ मे २०२६ पासून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनी २०२६” याचे भव्य उद्घाटन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), येथे होणार आहे. हे प्रदर्शन १४ मे २०२६ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली राहणार आहे.
यावर्षी प्रदर्शनात एकूण ५०० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील २३०, इतर राज्यांतील ६६, नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या महिला गटांचे ६८ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (FPO) ३४ स्टॉल्स समाविष्ट आहेत. याशिवाय NABARD, MAVIM, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका तसेच आदिवासी व कृषी विभागांसह विविध शासकीय संस्थांचे २२ स्टॉल्सही सहभागी झाले आहेत.
प्रदर्शनातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे राज्यातील विविध भागांतील महिलांनी तयार केलेले पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध असतील. तसेच हातमागाची वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, आकर्षक दागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
यावर्षी महालक्ष्मी सरसमध्ये एआर फोटोग्राफी, ॲनामॉर्फिक वॉल आणि इन्फोग्राफिक वॉल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी २५ किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरीची सुविधा देखील उपलब्ध आहे.
यावेळी उमेद-MSRLM चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. निलेश सागर (IAS) म्हणाले की, “महालक्ष्मी सरस हे केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतेला बळ देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. ‘लखपती दीदी’चे हे जाळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहे. आज महिला केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या उद्योग, वित्त आणि बाजारपेठेच्या मुख्य प्रवाहात सक्रिय भूमिका बजावत आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देत एक सक्षम व्यासपीठ निर्माण करत आहोत. भविष्यात अधिकाधिक महिला ‘लखपती दीदी’ बनून आपल्या कुटुंबासोबतच राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतील, हा आमचा प्रयत्न आहे.”*
ते पुढे म्हणाले की, “महिलांना केवळ विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश नाही, तर त्यांना संघटित, टिकाऊ आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योजिका बनविणे हे आमचे ध्येय आहे. *महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत*. यावर्षी ‘कंटेनर’ या संकल्पनेद्वारे महिला उद्योजकता आता निर्यात, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक संधींकडे झपाट्याने वाटचाल करत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, ब्रँडिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिलांना नवी ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, जेणेकरून त्यांची उत्पादने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचतील.”
या प्रसंगी उमेद MSRLM चे मुख्य परिचालन अधिकारी (COO) श्री. निखिल ओसवाल म्हणाले की, “महालक्ष्मी सरस उपक्रमात दरवर्षी महिला बचत गटांचे शेकडो स्टॉल उभारले जातात. अशा वेळी ग्राहकांना आपल्या पसंतीचा स्टॉल, उत्पादने किंवा खाद्यपदार्थ शोधताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी थीम पार्कमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किऑस्क मशीन बसविण्यात आले आहेत.
या मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना विशिष्ट स्टॉल, वस्तू किंवा खाद्यपदार्थांची माहिती सहजपणे मिळू शकते.”
यावर्षीच्या आयोजनाची मध्यवर्ती संकल्पना “कंटेनर” ही असून ती उद्योग, निर्यात आणि जागतिक संधींचे प्रतीक आहे. ही संकल्पना महिला उद्योजिकांच्या स्थानिक ते जागतिक प्रवासाचे प्रतिनिधित्व करते. कंटेनर-आधारित भव्य फसाड ‘उद्योग किल्ला’ म्हणून उभा राहत असून तो नवोपक्रम, व्यवस्थापन क्षमता आणि महिला नेतृत्वाचे प्रतीक आहे.
महालक्ष्मी सरस आता केवळ वार्षिक उपक्रम न राहता दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल बनत आहे. हा पुढाकार ग्रामीण महिलांना आर्थिक समावेशन, डिजिटल सशक्तीकरण आणि ब्रँडिंगसारख्या महत्त्वाच्या घटकांशी जोडत आहे. आजची महिला उद्योजिका केवळ उत्पादने विकत नाही, तर आपल्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळखही जागतिक स्तरावर पोहोचवत आहे. भविष्यात ई-कॉमर्स, निर्यात जाळे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे या उपक्रमाचा अधिक विस्तार होईल. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.
महालक्ष्मी सरस २०२६ हा महिलांच्या शक्तीचा, नवोपक्रमाचा आणि आत्मनिर्भरतेचा उत्सव असून महाराष्ट्राला नव्या आर्थिक क्रांतीकडे नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.




