Business

संगीत जगतातून अत्यंत दुःखाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे.

Suman Kalyanpur Passed Away

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 31/05/2026 ( 8850212023 )

भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये अजरामर गाणी गायली. 2023 मध्ये त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

मुंबई :  मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
बांगलादेशात जन्म
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत ‘सुमन हेमाडी’ (Suman Hemmadi) या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली.
गझलसम्राट तलत महमूद यांनी ओळखला आवाज
सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवेश अत्यंत रंजक होता. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग. दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली.
प्रवास आणि गाजलेली गाणी
पहिलं गाणं : रुपेरी पडद्यावरचं सुमन कल्याणपूर यांचं पहिलं गाणं ‘कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे’ हे होतं. या गाण्याने रसिकांना त्यांच्या आवाजाची भुरळ पाडली.
तानसेन पुरस्कार : सुमन कल्याणपूर जरी शुद्ध शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताकडे फारशा वळल्या नाहीत, तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक होती. त्यांनी गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या अजरामर गीताला मानाचा ‘तानसेन पुरस्कार’ लाभला होता.
विविध भाषांवर प्रभूत्व : सुमनजींनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!