प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; महालक्ष्मी सरस 2026’ नागरिकांसाठी विशेष मोफत बस सेवा सुरू
रेकॉर्ड ब्रेक विक्रीने गाजतेय महालक्ष्मी सरस २०२६; एका दिवसात ६ कोटींची उलाढाल

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 10/05/2026 📞 8850212023
रेकॉर्ड ब्रेक विक्रीने गाजतेय महालक्ष्मी सरस २०२६; एका दिवसात ६ कोटींची उलाढाल, प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई NHI24.COM(M) : बहुचर्चित ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शनस्थळी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विशेष मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा ९ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार असून, दररोज दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
महालक्ष्मी सरस प्रदर्शन २ मेपासून सुरू झाले असून, १४ मेपर्यंत बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेली हस्तकला, पारंपरिक वस्तू, खाद्यपदार्थ आणि विविध उत्पादने पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत.
नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, आयोजकांकडून दोन विशेष मार्गांवर मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
बससेवेचे मार्ग पुढीलप्रमाणे :
मार्ग क्रमांक १ : बांद्रा पूर्व रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी सरस प्रदर्शन, बीकेसी एमएमआरडीए मैदान
मार्ग क्रमांक २ : कुर्ला रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी सरस प्रदर्शन, बीकेसी एमएमआरडीए मैदान
दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन बस दिवसभर फेऱ्या मारणार असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल.
या उपक्रमामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, प्रवास खर्चातही बचत होणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेनंतर किंवा रात्रीच्या वेळेतही नागरिकांना प्रदर्शनाला सहज भेट देता यावी, हा या सेवेमागील प्रमुख उद्देश आहे.

महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये विक्रमी प्रतिसाद; एका दिवसात ६ कोटींची उलाढाल, आतापर्यंत २१ कोटींचा व्यवसाय
बीकेसी येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाने आता विक्रमी उलाढालीचा टप्पा गाठला आहे. ९ मे २०२६ रोजी एका दिवसात तब्बल ६ कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाली असून हा महालक्ष्मी सरसच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. २ मेपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनातून आतापर्यंत तब्बल २१ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून आयोजकांनी ४० कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.
महिला बचत गटांच्या उत्पादनाला मोठी मागणी
ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात राज्यभरातील महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला आहे. महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने, कलात्मक वस्तू आणि विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांना नागरिकांकडून मोठी मागणी मिळत आहे. त्यामुळे महिला बचत गटांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईकरांच्या आग्रहास्तव प्रदर्शनाची तारीख वाढवली
नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रदर्शनस्थळी होत असलेली मोठी गर्दी पाहता मुंबईकरांकडून महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शन अधिक दिवस सुरू ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात येत होती. नागरिकांचा हा आग्रह लक्षात घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून तातडीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शन आता १७ मेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना ग्रामीण संस्कृती, पारंपरिक कला आणि महिला बचत गटांनी साकारलेली विविध उत्पादने अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
उमेदची संपूर्ण यंत्रणा सेवेत
प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहक, महिला उद्योजिका आणि नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ‘उमेद’ची संपूर्ण यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे. उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांच्यासह संपूर्ण टीम प्रदर्शनस्थळी तैनात असून प्रत्येक सुविधेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मोफत बस सेवा आणि सुविधा
नागरिकांच्या सोयीसाठी वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशन आणि कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन येथून विशेष मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण प्रदर्शन परिसर वातानुकूलित (एसी) असून फूड कोर्टची सुविधाही एसीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक कुटुंबासह महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला भेट देत आहेत.



