Businessमहाराष्ट्र

नवीन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 6,400 तरुणांपर्यंत पोहोचणार आणि 5 कोटी रुपयांच्या कर्जांचे वाटप केले जाणार

मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक साधनांची उपलब्धता याद्वारे सूक्ष्म-उद्योजकांना साहाय्य करण्याचा एक उपक्रम

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/05/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : छत्रपती संभाजीनगर येथे यंग ग्रामप्रेन्युअर® विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी, भारतीय युवा शक्ती ट्रस्टने (BYST) यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लि.सोबत भागीदारी केली आहे. तरुण आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना शोधून काढणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे; याद्वारे जिल्ह्याची उद्योजकीय परिसंस्था बळकट करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या भागातील बीवायएसटीच्या नऊ वर्षांच्या यशस्वी कामगिरीचा आधार घेत — ज्या कालावधीत संस्थेने 1,000 हून अधिक उद्योजकांना पाठिंबा दिला आणि 25,000 हून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिले — हा नवीन कार्यक्रम 100 तरुण उद्योजकांना मार्गदर्शनासह आणि बँकेशी जोडलेल्या आर्थिक सहाय्यासह मदत करण्यावर, तसेच बीवायएसटीच्या मेन्टॉरिंग इंडिया® उपक्रमाद्वारे 150 संस्थात्मक मार्गदर्शकांना प्रशिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. या कार्यक्रमाद्वारे जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून 6,400 तरुणांपर्यंत पोहोचता येईल; 1,900 तरुणांना वैयक्तिक व्यावसायिक समुपदेशन दिले जाईल; आणि 800 तरुणांना बीवायएसटीचे प्रमाणित स्टेप उद्योजकता प्रशिक्षण दिले जाईल. या कार्यक्रमांतर्गत भागीदार बँकांमार्फत अंदाजे 5 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण होण्याची आणि 1,500 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीस चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय आकडेवारीनुसार, 20 ते 24 वयोगटातील व्यक्तींमध्ये रोजगाराचे प्रमाण केवळ 37% असून, युवकांमधील बेरोजगारीचा दर 23.7% (ILO, 2021) इतका आहे; ही बाब लक्षात घेता, हा उपक्रम विशेषतः महिला, अनुसूचित जाती/जमाती समुदायातील व्यक्ती आणि वंचित युवकांसाठी स्वयंरोजगार तसेच स्थानिक उद्योगांच्या वाढीचे स्पष्ट मार्ग निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगतो.

सुव्यवस्थित संपर्क मोहीम, समुपदेशन, प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य आणि दीर्घकालीन मार्गदर्शनाद्वारे, हा कार्यक्रम तरुण उद्योजकांना त्यांच्या व्यवहार्य कल्पनांचे उत्पादन, सेवा आणि किरकोळ विक्री क्षेत्रांमधील शाश्वत उद्योगांमध्ये रूपांतर करण्यास मदत करेल. यामध्ये बीवायएसटीचे ‘गुरू-शिष्य’ मार्गदर्शन मॉडेल केंद्रस्थानी असेल, ज्याअंतर्गत मान्यताप्राप्त स्वयंसेवक मार्गदर्शक वैयक्तिकृत मार्गदर्शन करतील.

या भागीदारीबद्दल भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, लक्ष्मी वेंकटरामन वेंकटेशन म्हणाले, “भारताच्या अर्थव्यवस्थेत, विशेषतः लहान शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये, सूक्ष्म-उद्योजकता मध्यवर्ती भूमिका बजावते. उत्पादन, सेवा आणि किरकोळ उद्योग महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते स्थानिक रोजगार निर्माण करतात, दैनंदिन गरजा पूर्ण करतात आणि समाजात पैशाचे चलनवलन सुरू ठेवतात. या तीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी तरुणांना नियोजनबद्ध पाठिंबा देऊन, हा कार्यक्रम त्यांना अनौपचारिक काम किंवा बेरोजगारीतून बाहेर पडून स्थिर, लहान व्यवसायांमध्ये प्रवेश करण्यास मदत करतो, जे वास्तववादी आणि स्थिर पद्धतीने प्रगती करू शकतात.”

यार्डी सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लि.च्या सीएसआर प्रमुख, श्रीमती भारती कोतवाल म्हणाल्या, “बीवायएसटी सोबतची आमची भागीदारी अशा तरुणांना साहाय्य करते, ज्यांच्याकडे कल्पना आहेत; परंतु ज्यांना योग्य मार्गदर्शन, नेटवर्क आणि भांडवलाची गरज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ‘मार्गदर्शनावर आधारित उद्योजकते’मध्ये गुंतवणूक करून, आम्ही तरुण उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, डिजिटलदृष्ट्या सजग आणि स्थानिक तसेच प्रादेशिक बाजारपेठांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडलेले असतील, असे उद्योग उभारण्यास मदत करण्याची इच्छा बाळगतो.”

जिल्ह्यातील स्थानिक विद्यापीठे, महाविद्यालये, इन्क्युबेशन सेंटर्स, बँका आणि उद्योग संघटना यांच्या सहयोगाने तरुणांना संघटित करण्याचे, व्यवहार्य व्यावसायिक कल्पनांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना कर्ज तसेच मार्गदर्शनाचा सुलभ लाभ मिळवून देण्याचे कार्य बीवायएसटी या वर्षभरात करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!