टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला भक्तिरस ‘अल्ट्रा झकास’वर ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला भक्तिरस ‘अल्ट्रा झकास’वर
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 11/05/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : “ज्ञानोबा माऊली-तुकाराम”च्या अखंड नामघोषात आणि टाळ-मृदंगाच्या भक्तिमय निनादात रंगलेला ‘अभंग तुकाराम’ हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी सज्ज होणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या १५ मे २०२६ रोजी ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असून, त्याचा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज ११ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली असून, अभिनेत्री स्मिता शेवाळे त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अजय पुरकर, समीर धर्माधिकारी यांच्यासह अनेक दमदार कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
चरित्रपट, नाटक आणि ऐतिहासिक या धाटणीतील हा चित्रपट संत तुकाराम महाराजांच्या जीवनप्रवासाची, त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आणि अभंगांमधून दिलेल्या जीवनतत्त्वज्ञानाची प्रभावी कहाणी मांडतो. पत्नी आवलीच्या साथीने समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारणाऱ्या तुकाराम महाराजांचा संघर्ष, भक्ती आणि प्रेमाचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. कविता, अभंग आणि संगीताच्या माध्यमातून ही कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच भक्तिभाव जागवणारी ठरेल.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत. वारकरी परंपरेचा सखोल अभ्यास आणि लोकजीवनाचा गाभा जपत हा चित्रपट साकारण्यात आला आहे. दिग्पाल लांजेकर म्हणतात, “तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मासोबतच जीवनाचं गूढ सत्य दडलं आहे. सोबतच लोकसाहित्य, लोकसंगीत आणि भक्तीचा संगम प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळेल.”
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी. ई. ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, ”अभंग तुकाराम’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि अध्यात्मिक वारशाचा एक भावनिक प्रवास आहे. अशा आशयघन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. जगभरातील प्रेक्षकांना संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि अभंगांचा दिव्य अनुभव डिजिटल माध्यमातून घेता येईल, याचा आम्हाला आनंद आहे.”
मराठी संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तिरसाचा भव्य अनुभव देणारा ‘अभंग तुकाराम’ आता ‘अल्ट्रा झकास ओटीटी’च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे भक्ती, अध्यात्म आणि अभंगांचा हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा…



