
POSTED BY MRUNALI SAKPAL ON DATED 19/09/2026(9004379946)
MUNBAI (NHI@24)बाल गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित काळाचौकीचा गणाधीश चषक शालेय मुलांच्या मोफत एकेरी कॅरम स्पर्धेत एसकेकेई स्कूलचा केवल कुळकर्णी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, श्री शिवाजी पॅरामिलिटरी स्कूल-पुणेचा चिराग शिंदे, पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे आदींनी सलामीचे सामने जिंकले. मुंबईचे माजी नगरपाल डॉ.जगन्नाथराव हेगडे, मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील शिंगे, दिलीप वरेकर, रवींद्र गोनबरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे सहप्रायोजित शालेय कॅरम स्पर्धेमधील सलामीच्या सामन्यात केवल कुळकर्णीने प्रथमपासून आघाडी घेत उशिरा सूर सापडलेल्या विशाल लोंढेचे आव्हान ११-७ असे संपुष्टात आणले. सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत शिवांश मोरेने अदनान अन्सारीवर १३-५ अशी मात केली. अन्य सामन्यात चिराग शिंदेने कार्तिक अनभुलेचा १४-० असा, प्रसन्न गोळेने वेदांत मांढरेचा १८-० असा, प्रेम चलवाडीने सरवद कामतचा २५-० असा, पुर्वा सावंतने माही चव्हाणचा १०-० असा तर मोइनुद्दीन शेखने वेदांथ कोकुलाचा ८-४ असा पराभव करून दमदार प्रारंभ केला. स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील ५१ खेळाडू सहभागी झाले असून पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहे.



