‘महालक्ष्मी सरस २०२६’ दिमाखात संपन्न; ५० कोटींहून अधिकची विक्रमी उलाढाल
१७ दिवसांचे प्रदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी
POSTED BY ANAGHA SAKPAL ON DATED 18/05/26 (9004379946)
मंत्री जयकुमार गोरे, सीओ निलेश सागर व सीओओ निखिलकुमार ओसवाल यांच्या नेतृत्वात यशस्वी आयोजन
मुंबई, (प्रतिनिधी: RMN) – यंदाचे ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शन १४ ऐवजी १७ दिवसांचे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास विशेष परवानगी दिली. त्यामुळे या प्रदर्शनातून पन्नास कोटींहून अधिकची उलाढाल झाली. ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वोत्तम सरस प्रदर्शन मुंबईत झाल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रदर्शनाला आता ग्लोबर स्वरूप आहे आहे, असा विश्वास महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी व्यक्त केला.
बीकेसी येथे संपन्न झालेल्या या प्रदर्शनात ५० कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरही प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल गर्दी झाली. दुपारी दोन वाजेपर्यंतच एक कोटींची विक्री झाली होती. साडेसहा हजार ग्रामीण कुटुंबांपर्यंत या माध्यमातून थेट लाभ पोहोचला.
मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर (आयएएस) म्हणाले की, “मी २०२४ मध्ये पदभार स्वीकारला. त्यानंतर चार महालक्ष्मी सरस करण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे. यंदाचे सरस आतापर्यंतचे सर्वोत्तम ठरले. मागील वर्षी बीकेसी येथे २७ कोटींची विक्री झाली होती. यंदा ४० कोटींचे उद्दिष्ट होते, मात्र ५० कोटींचा टप्पा पार झाला. तामिळनाडूच्या टीमनेही येथे भेट देऊन अभ्यास केला. त्यांनी उमेद अभियानाला राष्ट्रीय स्तरावर नोडल एजन्सी म्हणून स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली.”
मंत्री गोरे यांच्या प्रदर्शनाला अचानक भेटी –
मंत्री जयकुमार गोरे यांनी किमान तीन वेळा प्रदर्शनाला अचानक भेटी दिल्या. आयोजनापूर्वीही तीन बैठका घेतल्या. लहानसहान बाबींकडे त्यांनी स्वतः लक्ष दिल्याने प्रदर्शनाचे व्यवस्थापन उत्कृष्ट झाले, असे निलेश सागर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनापूर्वी भेट देताना “एकदा सरसला या, पुन्हा विचाराल पुढील सरस केव्हा?” असे उद्गार काढले. भाषणात त्यांनी हे प्रदर्शन ‘ग्लोबल स्टँडर्ड’ असल्याचे गौरवोद्गार काढले.
नागपूर व वाशी येथील समारोपातच महालक्ष्मी सरसचे दिमाखदार आयोजन करण्याची चुणूक दाखवली होती. ते प्रत्यक्षात उतरले याचा सार्थ अभिमान आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी दीड महिना आधीपासूनच मार्गदर्शन केले. लेआउटचे दोन-तीन वेळा रिव्हिजन त्यांनी स्वतः करून घेतले. शासनाचा प्रत्येक रुपया ताईंपर्यंत पोहोचला पाहिजे, उमेदचे प्रत्येक उत्पादन घराघरात पोहोचले पाहिजे, ताईंचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी त्यांनी मोठ्या मनाने निधी उपलब्ध करून दिला असे उमेदचे मुख्य कार्यपालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी म्हटले आहे.
ओसवाल यांनी समारोप करताना सांगितले की, “हा पैसा ताईंच्या लाइव्हलीहूड व एचडीआय सुधारण्यासाठी आहे. प्रत्येक निधीचा सदुपयोग झाला पाहिजे. पेशन्स, धीर आणि शिकण्याची वृत्ती असेल तर कुठल्याही परिस्थितीतून मार्ग निघतो. ताईंकडूनच आपण हा धडा शिकलो आहोत.”
एकूणच ‘महालक्ष्मी सरस २०२६’ ने विक्री, व्यवस्थापन, शिस्त व सामाजिक परिणाम या सर्वच आघाड्यांवर नवा बेंचमार्क निर्माण केला असून, भविष्यातील सरस प्रदर्शनांसाठी भक्कम पाया रोवला गेला आहे.
स्टॉलधारकांच्या प्रतिक्रिया-
माधुरी म्हात्रे, स्टॉल धारक, रायगड -:आज इथे उभं राहताना अभिमान, कृतज्ञता आहे. लहान मुलांसाठी आम्ही कपडे डिझाइन करून देतो. इथे आम्ही १६ दिवस होतो. या १६ दिवसांत आम्हाला प्रशिक्षण मिळालं. ग्राहक विश्वास, भावना अनुभवत असतो. संघर्षाशिवाय यश नाही. लहान मुलांना आमची उत्पादने विकत घेताना होणारा आनंद समाधान देत होतं. इथे खात्रीशीर सुरक्षा होती. त्यामुळे घरचे देखील निश्चिंत होते. इथला अनुभव कायम सोबत सोबत राहील.
दीपा मंगनाळे, फूड स्टॉल धारक -:आज उमेद हे नाव जागतिक ब्रँड झाले आहे. इतके मोठे सरस मी पहिल्यांदा बघितले आहे. इतके मोठे अधिकारी आमच्यासोबत नेहमी संवाद साधत होते. मला १६ तारखेला ठीक वाटत नव्हतं. मला दोन दिवस थंडी ताप होता. इथल्या वैद्यकीय कक्षातून मदत मिळाली. मला चक्कर आली. मी १० मिनिट बेशुद्ध होते. इथे तात्काळ रुग्णवाहिका मिळाली आणि रुग्णालयात उपचार मिळाले. तेव्हा बेशुद्ध झालेली लक्ष्मी आज तुमच्यासोबत कडक लक्ष्मी बनून बोलते आहे. जय उमेद.
राधा शाहू, स्टॉल धारक, पालघर -:इथे भारतातून महिला आल्या आहेत. माझा हा पहिलाच अनुभव आहे. आज मला उमेदने व्यासपीठावर येण्याची संधी दिली. एक पाड्यातील महिला शहरात आली. आणि इथे कसं काम चालत हे शिकली. इतकी चांगली व्यवस्था इथेच मिळते. अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.
पल्लवी हर्लदार, पश्चिम बंगाल -:मी पश्चिम बंगालच्या एका छोट्या गावातून आली आहे. इथले मॅनेजमेंट, व्यवस्था, शिस्त खूप चांगले आहे. मी पश्चिम बंगाल मध्ये अनेक प्रदर्शन पाहिली. पण अशी व्यवस्था नाही. आमच्या कलाकृतींना लोकांनी खूप प्रेम दिले. कलेचा आदर केला. हे सर्व आम्ही पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. जो देश जो प्रांत महिलांना सन्मान करत नाही. तो कधीच प्रगती करत नाही. आम्हाला महाराष्ट्रातून मुंबईतून खूप प्रेम मिळाले.
शुभांगी महाले, वर्धा, जिल्हा समन्वयक :-आमची जबादारी आम्ही व्यवस्थित पार पाडली असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. इथे कोणतीही वाईट घटना घडली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमची जबाबदारी पार पाडू शकलो. एक महिला आमच्याइथे आली. तिने तिचे बाळ आमच्याकडे दिले. नंतर त्यांनी सांगितले त्या डॉक्टर आहेत. त्यांनी जो विश्वास दाखवला तो महत्वाचा आहे. स्टॉल काढत असताना एक छोटी मुलगी रडू लागली. इतकी भावनीक जवळीक झाली आहे.
महत्त्वाचे मुद्दे –
– कालावधी: १४ ऐवजी १७ दिवसांचे प्रदर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष परवानगी
– विक्रमी उलाढाल: ५० कोटी ४१ लाख ३१ हजार रुपये; गतवर्षीच्या २७ कोटींहून जवळपास दुप्पट
– सहभाग: साडेसहा हजार ग्रामीण कुटुंबे, ६७ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
– नेतृत्व: मंत्री जयकुमार गोरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व लेआउट रिव्हिजन; निधीसाठी मोठे सहकार्य
– नियोजन: सीईओ निलेश सागर (आयएएस) व सीओओ निखिलकुमार ओसवाल यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय टीमची २४x७ मेहनत
– राष्ट्रीय दखल: तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन अभ्यास केला; उमेदला नोडल एजन्सी करण्याचा विचार
– इनोव्हेशन: शेवग्याच्या शेंगांचा गर, आंबट चिंचोके, २०० लिटर दूध प्रक्रिया करणारे गट, सीसीटीव्ही मॉनिटरिंग
– प्रशिक्षण व सुरक्षा: १६ दिवसांचे प्रशिक्षण, वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका, २४ तास सुरक्षा व्यवस्था
– डिजिटल आजीविका रजिस्टर: २०२५-२६ ची अचूक उलाढाल नोंदविण्याचे आवाहन; किमान १०० महिला कोटीच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता
– पुढील दिशा: लखपती दीदी संकल्पनेतून कोटीपती दीदींकडे वाटचाल; पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंगवर भर





