सावंतवाडीच्या भरत सावंतने प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा जिंकली

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 16/11/2026 (8850212023)
मुंबई : (NHI24) आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्स तर्फे बालदिनानिमित्त झालेली कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत सावंतने ११-१० असे चकविले आणि अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. अंतिम फेरीपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना लीलया पराभूत करून दर्जेदार खेळ करणाऱ्या पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या १६ विजेत्यांना-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्काराने कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व विजय नलावडे, फौंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर लोहे, प्रमुख पंच संतोष जाधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
कांदिवली येथे विविध जिल्ह्यातील ६८ शालेय खेळाडूंच्या सहभागाने सिनको चँम्पियन कॅरम बोर्डवर रंगलेल्या स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भरत सावंतने प्रथम मानांकित केवल कुळकर्णीचा १५-३ असा तर प्रसन्न गोळेने राजापूरच्या निधी सप्रेचा १६-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेतेपद एसकेकेंई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी व विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे यांनी तर उपांत्यपूर्व उपविजेतेपद संकल्प व्हॅली स्कूल-पुणेचा हर्षित शिंदे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, डॉन बॉस्को हायस्कूल-कणकवलीची दिव्या राणे, हॉली फॅमिली हायस्कूल-अंधेरीचा चैतन्य पोमेंडकर यांनी पटकाविले. दिव्यांश सिंग, आदित्य चौहान, वेदांश प्रजापती, हर्ष नागदा, देवांश बेलोसे, अनय म्हेत्रे, गौरी सावंत, विहा राणे आदींनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविला. बीएमसी इच्छुक शाळांनी मोफत कॅरम मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीला संपर्क साधावा, असे आवाहन याप्रसंगी अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण व सल्लागार अविनाश नलावडे यांनी केले.




