मनोरंजन कॅटेगरीमहाराष्ट्र

‘मर्दिनी’ चित्रपट आई आणि मुलीच्या नात्याभोवती फिरणारा

अनोख्या पद्धतीने सिद्ध केलंय ‘मर्दिनी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 10/05/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) 

सिनेमात मातृत्वाची कथा सांगणं एक गोष्ट आहे, पण तीच भावना प्रत्यक्ष आयुष्यात जगणं ही दुसरी गोष्ट. आणि हेच अनोख्या पद्धतीने सिद्ध केलंय ‘मर्दिनी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने. जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने केवळ चित्रपटाचं प्रमोशन न करता, या टीमने मातृत्वाचा खऱ्या अर्थाने सन्मान केला.

सिनेमाच्या पलीकडे जाणारा सन्मान…
‘मर्दिनी’ हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्याभोवती फिरतो. आज, जागतिक मातृदिनाच्या दिवशी चित्रपटाचं चौथं पोस्टर सोशल मीडियावर झळकलं. या पोस्टरमध्येही आई-मुलीच्या नात्याचीच वीण दिसते. पण ‘मर्दिनी’ टीम इथेच थांबली नाही. निर्माते श्रेयस तळपदे यांच्या पुढाकाराने प्रमुख कलाकार प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांनी आपापल्या आईंसोबत एकत्र असं खास लंचचं आयोजन केलं.

यावेळी श्रेयस तळपदे यांच्या पत्नी आणि या चित्रपटाच्या सह-निर्मात्या दीप्ती श्रेयस तळपदे देखील सहकुटुंब उपस्थित होत्या. ‘रील’मधल्या नात्याला ‘रिअल’ आयुष्यातही तितकंच महत्त्व देत संपूर्ण टीम एकत्र आली.

श्रेयनामावलीतही आईचं नाव – संकल्पनेला सलाम
‘मर्दिनी’ टीमने आणखी एक विशेष आणि हृदयस्पर्शी गोष्ट साधलीय. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत प्रत्येक टीम मेम्बरचं संपूर्ण नाव लिहिताना मधलं नाव त्यांच्या आईचं येईल, याचीही विशेष काळजी घेतली आहे. वडिलांचं नाव मधलं नाव म्हणून लिहिण्याची परंपरा असताना, आईच्या नावाला दिलेलं हे स्थान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.

या संकल्पनेचं कौतुक करत नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. “हा फक्त सिनेमा नाही, तर विचार आहे”, “मातृत्वाचा खरा सन्मान” अशा प्रतिक्रिया येत आहेत.

अनोखा योगायोग…
चौथ्या पोस्टरमध्ये दिसणारी आई-मुलीची केमिस्ट्री आणि त्याच दिवशी दुपारी कलाकारांनी स्वत:च्या आईंसोबत घालवलेले क्षण. हा निव्वळ योगायोग नसून, चित्रपटाच्या विषयाशी टीम किती प्रामाणिक आहे याचं प्रतीक आहे.

‘मर्दिनी’ केवळ मातृत्वावर आधारित सिनेमा नाही, तर मातृत्व जगणारी टीम आहे. सिनेमासाठी आईपण समजून घेणं आणि प्रत्यक्षात आईला वेळ देणं, दोन्ही गोष्टी या टीमसाठी महत्त्वाच्या आहेत.

दिग्दर्शक अजय मयेकर, श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांची ‘माझी तुझी रेशीमगाठ’पासूनची केमिस्ट्री ‘मर्दिनी’मध्येही दिसते. ही टीम मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी तर देतेच, पण सामान्यांच्या आयुष्यातील आई-मुलाच्या नात्याविषयी विशेष आपुलकी दाखवणारी माणसं आहेत. एका फ्रेममध्ये कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांच्या आई एकत्र आल्याने ‘मर्दिनी’ हे फक्त प्रोजेक्ट नसून एक कुटुंब आहे, याची प्रचिती आली.

चित्रपटाबद्दल
श्रेयस तळपदे आणि दीप्ती श्रेयस तळपदे निर्मित आणि अजय मयेकर दिग्दर्शित ‘मर्दिनी’ मध्ये प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत आहेत. आई आणि मुलीच्या नात्यातील गुंतागुंत, प्रेम आणि संघर्ष मांडणारा हा चित्रपट ३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘मर्दिनी’ टीमने दाखवून दिलं की प्रमोशन म्हणजे फक्त पोस्टर आणि मुलाखती नाहीत. ज्या विषयावर सिनेमा बनवतोय, तो विषय आधी जगला पाहिजे. जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने केलेली ही कृती आणि श्रेयनामावलीतील अनोखा बदल त्याचंच उदाहरण आहे – ‘रील’मधलं मातृत्व ‘रिअल’ आयुष्यात उतरवणारी ‘मर्दिनी’ टीम.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!