महाराष्ट्र

दृश्य-अदृश्य’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…

१९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरातील सिनेमागृहांमध्ये होणार प्रदर्शित...

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 00/05/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(Marathi Films)

काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घालतात. ‘दृश्य-अदृश्य’ हा आगामी मराठी चित्रपट विविध वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता अगोदरच शिगेला पोहोचली असताना नुकतेच ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाने जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले. त्यामुळे या चित्रपटाची चहूबाजूला चर्चा रंगली. आता पोस्टर प्रदर्शनामुळे हा चित्रपट पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. आरएसटी कॅनव्हास निर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मराठी सिनेसृष्टीसेबतच हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवरील पूजा सावंतचा चेहरा रसिकांच्या मनाची घालमेल करतो. तिच्या चेहऱ्यावरील भाव ‘दृश्य-अदृश्य’बाबतची उत्सुकता वाढविण्याचे काम करीत आहेत. दृश्य आणि अदृश्य यांच्यामधे एक पुसटशी रेषा असते, जी कधीच दिसत नाही, पण त्यात खूप काही दडलेले असते. या चित्रपटातील ‘दृश्य-अदृश्य’मध्येही असेच काहीसे गुंतागुंत निर्माण करणारे कोडे दडलेले असावे याची जाणीव पोस्टर पाहिल्यावर होते. डोळ्यांना दिसणारे आणि सत्य यांच्या संभ्रमात गुरफटवून ठेवणारी ‘दृश्य-अदृश्य’ची पटकथा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आहे. वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा धूसर होत गेल्या की सत्याचे ‘दृश्य’ किती ‘अदृश्य’ होते, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. पोस्टरवर पूजाच्या मागच्या बाजूला पोलिसी गणवेशात अशोक समर्थ आहे. एकूणच हे पोस्टर चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण करणारे आहे.

‘दृश्य-अदृश्य’च्या दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा लेखनही मिलिंद लेले यांनी केले असून, पूजा सावंतसोबत अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी कलाकार आहेत. संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार आशिष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी संगीत दिले आहे. गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांनी या चित्रपटातील गाणी गायली असून, नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले आहे. महेश बराटे यांची रंगभूषा, तर किर्ती जंगम-जोशी यांची वेशभूषा आहे. छायाचित्रण अमोल साळुंके यांनी केले असून, संकलनाची जबाबदारी सचिन वाघ यांनी पार पाडली आहे. नितिन बोरकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!