आरोग्य

न्यूईरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी यकृत प्रत्यारोपण , पत्नीने यकृताचा भाग दान करत पतीला दिले नवे आयुष्य

POSTED BY  : ANAGHA SAKPAL DATED ON  20/5/2026 ( 9004379946 )

नवी मुंबई : ( NHI24.COM)  प्रेम, धैर्य आणि समर्पणाची प्रचिती देणाऱ्या एका प्रकरणात 43 वर्षीय महिलेने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला. 48 वर्षीय पती दीर्घकाळापासून गंभीर यकृत विकाराशी झुंज देत होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि अखेर लिव्हर ट्रान्सप्लांट हाच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय उरला होता. वाशीच्या न्यूईरा हॉस्पिटलमध्ये प्रथमच करण्यात आलेल्या या अत्यंत गुंतागुंतीच्या ‘यकृत प्रत्यारोपण’ शस्त्रक्रियेला यश आले.

जी.आय. (G.I.) सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अनुराग श्रीमाल आणि डॉ. रोहन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हिपॅटोलॉजी विभागातील डॉ. अमितकुमार मांडोत आणि डॉ. चेतन कलाल यांचा समावेश असलेल्या डॉक्टरांच्या टीमने, एका अत्यंत गुंतागुंतीच्या ‘जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपणाची’ (Living Donor Liver Transplant) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. रुग्णाला डॉ. मनीष पेंडसे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अतिदक्षता विभागातील (ICU) अत्यंत महत्त्वाचे व्यवस्थापन डॉ. चंद्रशेखर तुळशीगेरी आणि डॉ. निशात तावडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले . डॉ. अदिती जैन आणि डॉ. विनोद यादव यांचा समावेश असलेल्या ‘आयसीयु लिव्हर ट्रान्सप्लांट टीम’ने, शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णाच्या देखरेखीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ (Anaesthesiologists) डॉ. अनिल सिंग आणि डॉ. आदित्य प्रभुदेसाई, डॉ वैशाली शेंडे यांच्या सहकार्याने, या संपूर्ण टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सुरळीतपणे काम केले.या प्रत्यारोपणासाठी तब्बल 18 डॉक्टर आणि सर्जन्स तसेच सुमारे 20 परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम केले.

नेरुळ येथील 48 वर्षीय मुकेश रामचंद्र तांडेल हे एक रिक्षाचालक असून गेल्या दोन वर्षांपासून गंभीर यकृताच्या आजाराने त्रस्त झाले होते. कालांतराने त्यांना ‘डीकंपेन्सेटेड क्रॉनिक लिव्हर डिसीज’ हा गंभीर आजार झाला. त्यामुळे त्यांना कावीळ, पोटात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे (अ‍ॅसाइटिस), मेंदूच्या कार्यावर परिणाम करणारी ‘हेपॅटिक एन्सेफालोपॅथी’, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी दुखापत आणि डाव्या पायाला सेल्युलायटिससारखे गंभीर संसर्ग झाला.

त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की चालणे, व्यवस्थित जेवणे किंवा अंथरुणावरुन उठणेही कठीण झाले होते. सततचा अशक्तपणा, पोटातील सूज आणि वाढत्या त्रासामुळे त्यांचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत लिव्हर ट्रान्सप्लांट हाच त्यांच्या जगण्याचा एकमेव मार्ग होता.

यावेळी त्यांच्या पत्नी जनाबाई तांडेल यांनी कोणताही विचार न करता यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला. स्वतः पूर्णपणे निरोगी असूनही मोठ्या शस्त्रक्रियेसाठी पुढे येणे हा अत्यंत धाडसी निर्णय होता.

डॉ. अनुराग श्रीमल( जी.आय. (G.I.) सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ) म्हणाले, रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा त्याचा आजार अत्यंत गंभीर अवस्थेत होता. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये गंभीर बिघाड दिसून आला होता, तर सोनोग्राफीमध्ये लिव्हर सिऱ्होसिसचे निदान झाले होते. त्यांना कावीळ, पोटात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे आणि मेंदूवर परिणाम करणारी लक्षणे दिसत होती. याशिवाय यकृताला इजा, मूत्राशयाचा संसर्ग आणि पायातील सेल्युलायटिसमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली होती. अशा अवस्थेत लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय उरला होता.

प्रत्यारोपणापूर्वी जवळपास दोन महिने डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये पोटातील पाणी वारंवार काढणे, संसर्गांवर उपचार आणि स्नायूंची होणारी झीज नियंत्रित करत उपचार करण्यात आले.

तपासणीदरम्यान पत्नीच्या यकृतामध्ये ‘ड्युअल पोर्टल वेन्स’ ही दुर्मिळ रक्तवाहिन्यांची रचना आढळून आली. तसेच यकृतात थोडेफार फॅटही होते. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरली होती. सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर 15 एप्रिल 2026 रोजी प्रत्यारोपण करण्यात आले.

डॉ. श्रीमल पुढे म्हणाले,*l पत्नीच्या यकृताच्या उजव्या बाजूकडील सुमारे ६५ टक्के टक्के भाग प्रत्यारोपित करण्यात आला. रुग्णाला प्रगत सिरॉसिस, पोर्टल हायपरटेन्शन आणि त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात द्रव साचल्याने शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर रुग्णाला रक्तसंक्रमणाची गरज भासली. शस्त्रक्रियेनंतर एक दिवस रुग्णाला व्हेंटिलेटर आणि विशेष औषधांच्या सपोर्टवर ठेवावे लागले. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे 12 ते 13 तास चालली.

डॉ. रोहन चौधरी (जी.आय. (G.I.) सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ) म्हणाले, रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसून येऊ लागली. काही दिवसांतच व्हेंटिलेटर काढण्यात आले. प्रत्यारोपित यकृत योग्यरित्या कार्यरत असल्याचे स्कॅनमध्ये दिसून आले. रुग्ण पुन्हा चालू लागल आणि त्यांची प्रकृती स्थिर झाली. पत्नीला एका आठवड्यातच घरी सोडण्यात आले, तर रुग्ण मुकेश यांना 24 एप्रिल 2026 रोजी स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले.

एक महिन्यानंतरच्या तपासणीत दोघांची प्रकृती चांगली सुधारणा दिसून आली. रुग्ण सध्या आवश्यक औषधे घेत असून त्यांची जीवनशैली आणि आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. लवकरच ते दैनंदिन कामकाजास सुरूवात करतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

डॉ चौधरी पुढे म्हणाले, लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. यासाठी अचूक नियोजन आणि अनुभवी टीमची आवश्यकता असते. मात्र या प्रकरणात सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे रुग्णाच्या पत्नीचे धैर्य. योग्य वैद्यकीय तपासणी आणि काळजी घेतल्यास दाता आणि रुग्ण दोघेही पूर्णपणे बरे होऊ शकतात.

रुग्ण मुकेश तांडेल म्हणाले, मी जगण्याची आशाच सोडून दिली होती. प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. पण माझी पत्नी माझ्यासाठी खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामुळे मला नवे आयुष्य मिळाले. डॉक्टरांनी योग्य वेळी उपचार केल्यामुळे आज मी पुर्ववत आयुष्य जगु शकतो.

पत्नी जनाबाई तांडेल म्हणाल्या, माझ्या पतीची प्रकृती I दिवसेंदिवस खालावत असल्याचे पाहून मी यकृत दानाचा निर्णय घेतला. त्यांना वाचवण्यासाठी मी जे काही करू शकत होते ते मी केले.

रुग्णालयाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी सांगितले की,  ही केवळ एक यशस्वी शस्त्रक्रिया नाही, तर मानवी नात्यांमधील प्रेम आणि त्यागाची भावनेचे उत्तम उदाहरण आहे. भारतात अवयवदानाबाबत आजही जागरूकतेचा अभाव दिसून येतो. समाजात अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण ठरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!