राज्यशैक्षणिक

‘नवनीत फाऊंडेशन’च्या शिक्षक प्रशिक्षण उपक्रमाची दशकपूर्ती

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 07/09/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM

शिक्षकांना ज्ञान, कौशल्ये, नवनवीन अध्यापन पद्धती आणि सकारात्मक दृष्टीकोन देऊन अधिक सक्षम करावे, त्यांच्यामार्फत शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी ‘नवनीत फाऊंडेशन’तर्फे हाती घेतलेल्या ‘शिक्षक प्रशिक्षण उपक्रमा’ने आपली १० वर्षे पूर्ण केली आहेत. ‘नवनीत फाउंडेशन’ने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जून २०१६ मध्ये ‘शिक्षक प्रशक्षण उपक्रमाची स्थापना केली होती. ‘नवनीत’चे संचालक श्री. अनिल गाला यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे नेतृत्व  माजी शिक्षणाधिकारी श्रीमती बसंती रॉय गेली १० वर्षे यशस्वीपणे करत आहेत.

यंदाच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुरुवार ३ सप्टेंबर रोजी ‘नवनीत’च्या दादरच्या कार्यालयातील सभागृहात दशकपूर्ती सोहोळा आयोजित  होणार असून मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री. राजेश कंकाळ तसेच दक्षिण मुंबईच्या शिक्षण निरीक्षक डॉ. वैशाली वीर हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात मोलाचे योगदान देणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे.

कृतिपत्रिका, गणित, इंग्रजी, मराठी, स्कॉलरशिप परीक्षा, NEP- २०२० आणि शालेय नेतृत्व (School Leadership) अशा अत्यंत गरजेच्या विषयांवर ‘नवनीत’तर्फे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे आणि नंदूरबार अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांत सातत्याने विनामूल्य प्रशिक्षणे आयोजित केली जातात. आतापर्यंत सुमारे ६७० कार्यशाळांच्या माध्यमातून ३५ हजार शिक्षकांना समृद्ध करण्याचे कार्य या उपक्रमाने केले आहे. सध्या बदललेल्या नव्या पाठ्यपुस्तकांवर आधारित प्रशिक्षण सत्रे घेण्यात येत आहेत. या प्रशिक्षणांचा लाभ अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनाही होतो.

‘नवनीत’च्या प्रशिक्षणांची खासियत म्हणजे त्या त्या विषयांतील तज्ज्ञांचा शोध घेऊन प्रशिक्षणाची सखोल आखणी, उत्तम तयारीचे प्रशिक्षक, व्याख्यानांऐवजी कृतियुक्त कार्यशाळा व गटकार्य पद्धतीचा अवलंब आणि कार्यशाळेचा दर्जेदार अनुभव. या प्रशिक्षणांनंतर वर्गातील अध्यापनाचा दर्जा वाढल्याची तसेच शालेय शिष्यवृती परीक्षांतील निकाल उंचावल्याची प्रतिक्रिया आतापर्यंत अनेक शिक्षकांनी वेळोवेळी दिली आहे.

२०२०मध्ये कोरोना काळात शाळा बंद असताना या उपक्रमाअंतर्गत सुरू केलेल्या ‘नवदिशा पोर्टल’ व ‘नवदिशा मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आज शिक्षकांना शैक्षणिक लेख, व्हिडीओ, शासन निर्णय, शासकीय परिपत्रके, पुस्तकांचे परिचय आणि यशोगाथा इत्यादी साहित्य  उपलब्ध होत आहे. सुमारे २० हजार शिक्षक या ‘नवदिशा पोर्टलचा लाभ घेतात.

नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे संचालक अनिल गाला यांनी सांगितले, “देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना सक्षम बनवणे हे समाजासाठी सर्वांत मोठे योगदान असते. गेल्या दशकभरापासून शिक्षकांना आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आधुनिक अध्यापन तंत्रे यांद्वारे सज्ज करणे हा नवनीतच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश राहिला आहे. आज आपल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण होत असताना आणि जवळपास ३५,००० शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा टप्पा गाठताना आम्हाला मोठे समाधान आहे. शिक्षकांच्या विकासात सातत्याने गुंतवणूक करणे हे आम्ही आमचे उत्तरदायित्व मानतो, कारण जेव्हा शिक्षक प्रगती करतात तेव्हा पिढी घडते आणि संपूर्ण राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते.”

प्रशिक्षित आणि स्वयंप्रेरित शिक्षक हेच खरे राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार असतात. शिक्षकांच्या सक्षमीकरणातून राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावत ‘नवनीत फाऊंडेशन’ने गेल्या १० वर्षांत शिक्षक शिक्षकांच्या गुणवत्तेचा एक नवा मापदंड निर्माण केला आहे. या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संपूर्ण शिक्षण क्षेत्रातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!