खेल

आ. सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक कॅरम स्पर्धेत प्रसन्न, उमैर, नीलची विजयी सलामी

आ. सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक कॅरम स्पर्धेत प्रसन्न, उमैर, नीलची विजयी सलामी

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/03/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M)

आमदार सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे, उमैर पठाण, नील म्हात्रे आदींनी सलामीचे सामने जिंकले. सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत प्रसन्न गोळेने सुयश तोडकरचे आव्हान २५-० असे सहज संपुष्टात आणले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ तर्फे सुरु झालेल्या विविध जिल्ह्यातील १४ वर्षाखालील ५४ खेळाडूंच्या स्पर्धेचे उद्घाटन संघाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते, राजन लाड, साई निकम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

परेल येथील आरएमएमएस सभागृहात उमैर पठाणने प्रारंभी मोठी आघाडी घेतल्यामुळे दडपणाखाली खेळणाऱ्या आर्या शाहला १७-१० असा पराभव पत्करावा लागला. वरद गायकवाडने पहिलाच बोर्ड १०-० असा घेत उशिरा सूर सापडलेल्या श्रेयस पवारला १५-९ असे नमविले. अन्य सामन्यात नील म्हात्रेने वरद कोल्हेला २५-० असे, अदिशेष गोफणेने पूर्वा पवारला ८-२ असे, योग पालकरने जयेश कांबळेला ११-१ असे तर उपांशु गोळेने स्वरूप शिंदेला १०-२ असे हरवून पहिली फेरी जिंकली. चँम्पियन कॅरम बोर्डावर सुरु झालेल्या स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिला जाणार आहे. सबज्युनियर खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणारे आमदार सचिनभाऊ अहिर यांचे शालेय क्रीडा चळवळीमधील योगदान उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दर्जेदार शालेय कॅरम स्पर्धेचे विनामुल्य आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!