
Posted BY:: ANAGHA, 14 NOVEMBER 2025 9004379946
MUMBAI (NHI@24)आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बाल दिनानिमित्त झालेली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक खुली बुध्दिबळ स्पर्धा आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुध्दिबळपटू आदित्य बारटक्केने सर्वाधिक साखळी ६ गुण नोंदवून जिंकली. निर्णायक साखळी सातव्या फेरीत पहिल्या पटावर अरेना फिडे मास्टर १३ वर्षीय हृदय मणियारने (५.५ गुण) पांढऱ्या मोहरानी द्वितीय मानांकित आदित्य बारटक्केविरुध्द खेळतांना प्रारंभी जोश दाखविला. परंतु नंतर अपराजित आदित्य बारटक्केची आक्रमकता पाहून १९ व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला. विजेतेपदाचे अन्य दावेदार फिडे गुणांकित ९ वर्षीय कथित शेलार (५.५ गुण) व अनिरुध्द सुब्रमण्यन (५.५ गुण) यांनी देखील दुसऱ्या पटावर निकाली खेळ न करता २२ व्या चालीला बरोबरी मान्य केली. परिणामी आदित्य बारटक्केचा रोख पुरस्कारासह अजिंक्यपदाच्या एलआयसी-आयडियल चषकाचा मार्ग सुकर झाला.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या एलआयसी-आयडियल खुल्या स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ३३ बुध्दिबळपटूसह ६४ खेळाडूंनी भाग घेतला. प्रतिष्ठेच्या खुल्या स्पर्धेत आदित्य बारटक्केने (६ गुण) प्रथम, तन्मय मोरेने (५.५ गुण) द्वितीय, व्ही. प्रिजेशने (५.५ गुण) तृतीय, अनिरुध्द सुब्रमण्यनने (५.५ गुण) चौथा, हृदय मणियारने (५.५ गुण) पाचवा, कथित शेलारने (५.५ गुण) सहावा, ओम देवरुखकरने (५ गुण) सातवा, यश कापडीने (५ गुण) आठवा, रियान पटनीने (५ गुण) नववा तर अरविंद चंद्रकरने (५ गुण) दहावा क्रमांक रोख पुरस्कारासह पटकाविला. फिडे इंस्ट्रक्टर बुध्दिबळ प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी, आयडियलचे सल्लागार विलास डांगे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले. खुल्या व शालेय बुध्दिबळ स्पर्धेत एकूण २७ रोख आणि १२९ चषक पुरस्कार देण्यात आले.
एलआयसी-आयडियल खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित आदित्य बारटक्के विजेता



