एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलमधील १२५ रुग्णांनी शस्त्रक्रिया, रुग्णालयीन मुक्काम टाळत प्रोस्टेट कर्करोगावर केली मात शस्त्रक्रिया
रुग्णालयात मुंबईतील पहिले व एकमेव सायबरनाइफ आणि व्हर्सा एचडी प्रणालीद्वारे अत्याधुनिक एसबीआरटी तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 03/09/2026 (8850212023)
मुंबई (NHI24) : प्रोस्टेट कर्करोगावर उपचार घेणा-या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा दीर्घकाळ रुग्णालयात मुक्काम करून उपचार घेणे आता बंधनकारक नाही, हे मुंबईतील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलने सिद्ध केले आहे. या रुग्णालयाने १२५ हून अधिक प्रोस्टेट रुग्णांवर ‘व्हर्सा एचडी’ प्रणालीद्वारे ‘एसबीआरटी’ रेडिएशन उपचारपद्धती दिली असून, काही निवडक रुग्णांवर ‘सायबरनाइफ’ या रोबोटिक उपकरणाद्वारे यशस्वीरित्या रेडिएशन उपचारही पूर्ण केले आहेत.
विविध टप्प्यांतील प्रोस्ट्रेट कर्करोगाच्या रुग्णांना हे अत्याधुनिक उपचार दिले गेले. हे तंत्रज्ञान शस्त्रक्रियेला पर्याय उपलब्ध करत यशस्वी व प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध करून देते. डॉक्टर्स हे रुग्णांचे वय, आरोग्य, आजाराची तीव्रता तसेच उपचारांची गरज आदी घटकांबाबत विचारविमर्श केल्यानंतर उपचारपद्धतींबाबत अंतिम निर्णय घेतात.
‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’मधील जागतिक कर्करोग अहवाल (ग्लोबोकॉन २०२२नुसार), देशात २०२२ मध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झालेल्या ३७ हजार ९४८ रुग्णांची नोंद झाली. हा आकडा २०४५ पर्यंत दरवर्षागणिक सुमारे ८२ हजार २५२पर्यंत नोंदवला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ही आकडेवारी ध्यानात घेता, देशात प्रोस्टेट कर्करोगावर मात करण्यासाठी आवश्यक उपचारांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
‘एसबीआरटी’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान थेट कॅन्सरच्या गाठीला लक्ष्य करते. या प्रक्रियेत शरीरातील इतर अवयवांचे संरक्षण केले जाते. ही उपचारपद्धती काही रुग्णांमध्ये पाच सत्रांतच पूर्ण होते. या पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेसारखी कोणतीही चिरफाड केली जात नाही. प्रोस्टेट ग्रंथी काढण्याचीही गरज भासत नाही. ही उपचारपद्धती बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. प्रत्येक सत्र पूर्ण केल्यानंतर रुग्णाला घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
प्रोस्टेट कर्करोगावर मात करण्यासाठी ‘सायबरनाइफ’ ही प्रणाली परिणामकारक ठरते. मुंबईत केवळ कुलाबा येथील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल येथे ही प्रणाली उपलब्ध आहे. ‘सायबरनाइफ’ ही प्रणाली उपलब्ध करुन देणारे एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल हे मुंबईतील एकमेव रुग्णालय आहे. ही प्रणाली रोबोटिक अचूकता आणि अत्याधुनिक इमेज तंत्रज्ञानाचा मिलाफ मानली जाते. उपचारादरम्यान अचूकता राहण्यासाठी तसेच अवयवांच्या अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
मुंबई येथील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. त्रिणंजन बासू म्हणाले,” प्रोस्टेट कर्करोगावर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय आहे, असा अनेक रुग्णांचा समज आहे. दरवेळी शस्त्रक्रिया करणे गरजेचे नसते. काही निवडक रुग्णांवर एसबीटीआरटी सारख्या अत्याधुनिक रेडिएशन तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतीही चिरफाड, शस्त्रक्रिया किंवा दीर्घकाळ रुग्णालयात वास्तव्य न करताही उपचार दिले जातात.”
“प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते. उपचारांची शिफारस करण्यापूर्वी आम्ही रुग्णाचे वय, कर्करोगाचा टप्पा, धोक्याची पातळी, त्यांचे एकूण आरोग्य तसेच वैयक्तिक पसंती विचारात घेतो. या उपचारपद्धतींत अत्याधुनिक प्रतिमा दर्शिका (एडवान्स इमेज गायडन्स) आणि व्हर्सा एचडी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मूत्राशय आणि गुदाशय या नजीकच्या अवयवांचे संरक्षण होत थेट कर्करोगाच्या गाठीवर अचूक रेडिएशन दिले जाते. हे उपचार निवडक रुग्णांवर केवळ पाच सत्रांत पूर्ण होतात. हे तंत्रज्ञान ज्येष्ठ नागरिक तसेच शस्त्रक्रियेसाठी सक्षम नसलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते. मुंबईतील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलने प्रोस्टेट कर्करोगाच्या मध्यम-धोका, उच्च-धोका आणि काही निवडक मेटास्टॅटिक श्रेणीतील रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. यातील अनेक रुग्ण ६० ते ७५ वयोगटातील असून, २० रुग्ण ७५ ते ८५ वयोगटातील आहेत.”
हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस लिमिटेडचे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) श्री. रुपेश चौबे म्हणाले, “३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव तसेच भारतातील सर्वात मोठे कर्करोग रुग्णालयाचे नेटवर्क असलेल्या एचसीजीने कर्करोग उपचार अत्याधुनिक तसेच सुलभ व्हावे, याकरिता सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील एचसीजीमध्ये शहरांतील पहिले व एकमेव सायबरनाइफ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाला कर्करोगतज्ज्ञ, मेडिकल फिजिसिस्ट आणि रेडिएशन थेरपिस्ट यांसारख्या अनुभवी टीमचे पाठबळ मिळाले आहे. याकरिता केवळ तंत्रज्ञान पुरेसे असून, उत्तम परिणामांसाठी क्लिनिकल अनुभव, अचूक उपचारांचे नियोजन आणि योग्य रुग्णाची निवडही महत्त्वाची असते. रुग्णांना वैयक्तिक स्वरूपात गुणवत्तापूर्वक उपचार देणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
मुंबईतील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलचे क्लस्टर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) श्री. अविक चौहान म्हणाले, “अत्याधुनिक रेडिएशन थेरपीद्वारे १२५ हून अधिक प्रोस्टेट रुग्णाना यशस्वी उपचार देणे हा एचसीजी मुंबईसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आमच्याकडील या उपलब्धतेमुळे रुग्णांना कमी वेदनादायी आणि सोयीस्कर उपचारांचे पर्याय उपलब्ध होतात. अनुभवी कर्करोग तज्ज्ञ तसेच ‘व्हर्सा एचडी’ आणि ‘सायबरनाइफ’ यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही प्रत्येक रुग्णाला अचूक उपचार देतो. उपचारादरम्यान रुग्णांचा अनुभव, त्यांना मिळणारी विश्रांती तसेच उपचारांतील अचूकता वाढवण्यासाठी हे रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे.”
यावेळी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्करोगावर मात करणा-या रुग्णाने आपला अनुभव सर्वांसमोर मांडला. “प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयातील दीर्घकालीन मुक्काबाबत भीती वाटत होती. एचसीजीच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय उपलब्ध असलेल्या उपचारांची तपशीलवार माहिती दिली. त्यामुळे रेडिएशनचे सर्व सत्र पूर्ण केले. प्रत्येक सत्रानंतर पटकन घरी जाता आले. डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच कर्मचा-यांच्या सहकार्यामुळेच संपूर्ण उपचारादरम्यान आत्मविश्वास निर्माण झाला.”, असेही रुग्णाने नमूद केले.
कर्करोगाने निदान झाल्याने दुःखाचा डोंगरच कोसळला होता, असे सांगत दुस-या रुग्णाने उपचारांबाबत समाधान व्यक्त केले. या रुग्णाने सांगितले की, “कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर मला आयुष्य आता अचानकपणे थांबल्यासारखे वाटले होते. कर्करोगाच्या आजारामुळे होणारी वेदना, शस्त्रक्रिया यांसह कुटुंबावर अवलंबून राहावे लागणार यांमुळे मनात भीती निर्माण झाली होती. मात्र हे उपचार शस्त्रक्रियेविना तसेच रुग्णालयात बराच काळाकरिता दाखल न होताही करता येणे शक्य आहेत, असे डॉक्टरांनी समजावले. स्वतःबद्दल मनात नवी आशा निर्माण झाली. ही उपचारपद्धती माझ्या कल्पनेपेक्षाही सोपी आणि वेदनामुक्त होती. वैद्यकीय टीमने प्रत्येक टप्प्याबाबत माहिती दिली. सर्व शंकांचे निरसन केले. त्यांच्या सहकार्यामुळे मला रुग्ण नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याची वागणूक अनुभवता आली. “
कर्करोगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय नाही, याबाबत जनजागृती करण्यासाठी आता मुंबईतील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक रुग्णालयाने आपल्या प्रकृतीनुसार शस्त्रक्रिया, रेडिएशन, हार्मोन थेरपी किंवा उपचारांचा एकत्रित पर्याय निवडण्यासाठी कर्करोगतज्ज्ञांच्या टीमचा सल्ला घ्यावा, असे हॉस्पिटलच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलबाबत:
मुंबई येथील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी अत्याधुनिक निदान पद्धती, शस्त्रक्रिया तसेच रेडिएशन तंत्रज्ञान आदी सोयीसुविधा उपलब्ध आहे. रुग्णांना अनुभवी कर्करोगतज्ज्ञांच्या टीमकडून उपचार दिले जातात. रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागात व्हर्सा एचडी, इमेज-गाईडेड रेडिएशन थेरपी, एसबीआरटी आणि सायबरनाइफ यांसारख्या आधुनिक प्रणाली उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाच्या आधारे कर्करोगतज्ज्ञ प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक पातळीवर अचूक उपचारपद्धतींचे नियोजन करतात.




