कबड्डी दिनाच्या आयडियल नियम मार्गदर्शन शिबिरात आशिष पनवार सर्वोत्तम
यावेळी निवडक शिबिरार्थीना ज्येष्ठ पत्रकार विनायक दळवी लिखित ‘कबड्डीतील किमयागार’ पुस्तक भेटरुपी देण्यात आले.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 16/07/2026 (8850212023)
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे समता विद्या मंदिर-असल्फा सहकार्याने कबड्डी दिन – १५ जुलैनिमित्त झालेल्या मोफत कबड्डी नियम मार्गदर्शन शिबीरात शालेय राष्ट्रीय ख्यातीचा कबड्डीपटू आशिष पनवारने सर्वोत्तम शिबिरार्थीचा पुरस्कार पटकाविला. याप्रसंगी रोख पुरस्कारासह शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह स्वरुपाचा “आयडियल कबड्डीरत्न” पुरस्कार कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर व अनंत विचारे यांना राष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपटू किरण जिकमडे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी निवडक शिबिरार्थीना ज्येष्ठ पत्रकार विनायक दळवी लिखित ‘कबड्डीतील किमयागार’ पुस्तक भेटरुपी देण्यात आले.
कबड्डी महर्षी स्व. शंकरराव साळवी यांना अभिवादन करून शालेय ६१ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या कबड्डी शिबिराचे उद्घाटन समता विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका भारती पावले यांनी केले. संयोजक लीलाधर चव्हाण यांनी शालेय मुलामुलींना कबड्डी खेळाचे व सामन्यांसंबंधी नियम विषयक खुलासेवार माहिती दिली. शिबिरार्थीच्या कबड्डी विषयक शंकांचे निरसन मार्गदर्शक किरण जिकमडे, कबड्डीपटू सुनील खोपकर व हेमंत तोडणकर, सुपरवायझर राधुराम, क्रीडा शिक्षक सुनील भोसले आदींनी केले. शालेय खेळाडू रुद्र परब, शुभम यादव, यशोदा बोरा, शुभम मोरे आदींनी उत्कृष्ट शिबिरार्थीचा पुरस्कार मिळविला. अभ्यासाबरोबर खेळाला प्रोत्साहन देणारे समता शाळेचे सचिव राजेश सुभेदार यांचा विशेष गौरव आयडियलतर्फे करण्यात आला.




