आनंदराव अडसूळ ट्रस्ट कॅरम स्पर्धेत जैतापूरचा आर्यन राऊत विजेता
आनंदराव अडसूळ ट्रस्ट कॅरम स्पर्धेत जैतापूरचा आर्यन राऊत विजेता

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/04/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्तच्या विनाशुल्क पहिल्या टप्प्यातील निवड चाचणी शालेय कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय दर्जाचा सबज्युनियर कॅरमपटू जैतापूरच्या आर्यन राऊतने विजेतेपद पटकाविले. प्रथमपासून अचूक खेळ करणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतने श्री नारायण गुरु हायस्कूल-चेम्बूरच्या उमैर पठाणचे आव्हान ११-० असे संपुष्टात आणले. पहिले दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या उमैर पठाणला उत्तरार्धात सूर सापडला नाही. परिणामी उमैरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहामध्ये झालेल्या विविध जिल्ह्यातील खेळाडूंच्या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तनया दळवी व पोद्दार अकादमी शाळेच्या प्रसन्न गोळेने उपांत्य उपविजेतेपद तर अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलच्या ध्रुव भालेराव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या केतकी मुंडले, सीएनएम स्कूलच्या राशी कोटेचा व पार्ले टिळक विद्यालयाच्या अमेय जंगम यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकाविले. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईचे खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे, कॅरमप्रेमी संदेश चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविले. पुरस्कार प्राप्त खेळाडूंना १ ते ३ मे कालावधीमध्ये होणाऱ्या स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षांमुळे स्पर्धकांच्या आग्रहास्तव दुसऱ्या टप्प्यातील निवड चाचणी शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धा २५ एप्रिल रोजी होणार आहे.




