द हॅबिटॅट्स ट्रस्टकडून अनुदानांच्या नवव्या आवृत्तीसाठी अर्ज मागविले आहे
द हॅबिटॅट्स ट्रस्टकडून अनुदानांच्या नवव्या आवृत्तीसाठी अर्ज

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 16/01/2026 📞 8850212023
देशभरातील संवर्धन प्रकल्पांसाठी ३.५ कोटी रुपयांचे अनुदान
मुंबई/नोएडा NHI24.COM(M), : जैवविविधतेचा ऱ्हास, हवामान बदलाचे संकट आणि वाढती पाणीटंचाई या गंभीर विकासात्मक आव्हानांवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ या ना-नफा संस्थेने ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट ग्रँट्स’च्या नवव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. या अनुदान योजनेअंतर्गत देशभरातील संवर्धन कार्यकर्ते आणि ना-नफा संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज प्रक्रिया १० जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, १० फेब्रुवारी २०२६ रोजी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
भारतामध्ये जगातील सुमारे ७ ते ८ टक्के जैवविविधता आढळते. मात्र, औपचारिकरीत्या संरक्षित क्षेत्रांबाहेरील अनेक प्रजाती आणि परिसंस्थांना पुरेशा निधीअभावी संवर्धन आणि संशोधनाची संधी मिळत नाही. हीच दरी भरून काढण्यासाठी टीएचटी अनुदान योजना राबवण्यात येत असून, धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजाती आणि नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण, सर्वांगीण आणि अनुकरणीय प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. विशेषतः कमी परिचित प्रजाती आणि दुर्लक्षित परिसंस्थांवर या योजनेचा भर आहे.
नोंद घेण्यासारख्या महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सादर करण्याच्या तारखा: १० जानेवारी ते १० फेब्रुवारी, २०२६
अनुदान प्राप्तकर्त्यांची घोषणा: ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात
या अनुदानांतर्गत एकूण ३.५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार असून, समुदाय सहभाग, दीर्घकालीन शाश्वतता आणि ठोस पर्यावरणीय परिणाम दर्शवणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाईल. अर्ज www.thehabitatstrust.org या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
२०१८ मध्ये स्थापनेपासून, द हॅबिटॅट्स ट्रस्टच्या अनुदान कार्यक्रमाने देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३८ हून अधिक प्रकल्पांना पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत संस्थेने १६.२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित केला असून, यामध्ये प्रजातींचे पुनरुज्जीवन, अधिवास पुनर्स्थापना, उपयोजित संशोधन तसेच समुदाय-नेतृत्वाखालील संवर्धन प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवरील संवर्धन क्षमता बळकट होत असून, जमिनीवर प्रत्यक्ष परिणाम साधले जात आहेत.




