उदयोन्मुख क्रिकेटंपटूसाठी नववर्षात एसपीजी-रोझ मर्क अकादमी सज्ज
उदयोन्मुख क्रिकेटंपटूसाठी नववर्षात एसपीजी-रोझ मर्क अकादमी सज्ज

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 23/12/2025 📞 9004379946
मुंबई,( NHI@24.COM) : क्रिकेट क्षेत्रात शतकी वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याने क्रीडा व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट, वितीय सेवा आदी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या रोझ मर्क लिमिटेड या कंपनी सोबतीने ८ जानेवारीपासून एसपीजी खेळपट्टीवर नव्या जोशात एसपीजी-रोझ मर्क क्रिकेट अकादमी सुरु करीत आहे. मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेट प्रतिभेला घडवण्याच्या कार्याला शीघ्र गती मिळावी तसेच ‘भारतीय क्रिकेटची नर्सरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित शिवाजी पार्क मैदानाची परंपरा पुढे नेण्याचा एसपीजी व रोझ मर्क कंपनीचा मानस आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अकादमी युवा खेळाडूंना सर्वसमावेशक प्रशिक्षण देणार असून गोवा संघाचे माजी खेळाडू विनय दांडेकर प्रमुख प्रशिक्षकपदी आहेत. वयोगट स्पर्धांसाठी खेळाडू तयार करणे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वरिष्ठ संघांमध्ये स्थान मिळवून देणे, असा यामागचा उद्धेश आहे. १४ वर्षांखालील मुलांसाठी ८ जानेवारीला, १९ वर्षांखालील मुलांसाठी ९ जानेवारीला, १६ वर्षांखालील मुलांसाठी १० जानेवारीला सकाळी ७:३० वाजता असे निवड चाचणीचे वेळापत्रक संबंधितांसाठी मोफत खुले आहे. चाचणीवेळी पांढऱ्या क्रिकेट गणवेशात सोबत जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्डची छायाप्रत असणे, आवश्यक आहे. वयाची पात्रता एमसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होईल. अंतिम निवड झालेले खेळाडू एसपीजी मैदानावर अकादमीच्या सराव सत्रांमध्ये सहभागी होतील.
पत्रकार परिषदेत समन्वयक प्रवीण आमरे म्हणाले की शिवाजी पार्क हे नेहमीच भारतीय क्रिकेटमधील प्रतिभेचे माहेरघर राहिले आहे. रोझ मर्क कंपनीसोबतच्या भागीदारीद्वारे, आम्ही क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि संधी देण्यासाठी वचनबद्ध आहोत. यंदाच्या हंगामाची सुव्यवस्थित निवड प्रक्रिया आणि अनुभवी प्रशिक्षण, यामुळे आम्हाला अशा खेळाडूंना ओळखण्यास आणि घडवण्यास मदत करेल कि जे मुंबई आणि भारताचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करू शकतील. रोझ मर्कचे कार्यकारी अध्यक्ष पुरवेश शेलटकर यांनी सांगितले कि एसपीजी रोझ मर्क क्रिकेट अकादमीद्वारे उत्कृष्ट प्रशिक्षण व सुविधा पुरवून आम्ही क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करणार आहोत. रोझ मर्कचे अध्यक्ष उदय तारदळकर म्हणाले कि एसपीजीसोबतच्या संबंधामुळे आम्ही भारतीय क्रिकेटच्या भविष्यात गुंतवणूक करत आहोत. नवीन हंगामाची रचना आणि तज्ञ प्रशिक्षण यामुळे महत्त्वाकांक्षी खेळाडूंना उच्च स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा मार्ग सुकर होईल. हा उपक्रम विनाशुल्क असून अधिक माहितीसाठी शिवाजी पार्क कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा.



