प्रल्हाद नलावडे स्मृती कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता
प्रल्हाद नलावडे स्मृती कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 28/12/2025 📞 9004379946
मुंबई,( NHI@24.COM) :आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, अविनाश नलावडे स्पोर्ट्स व सिबीइयू यांच्या सहकार्याने झालेल्या स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक राज्य स्तरीय मोफत शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. चुरशीच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने अचूक फटक्यांची आतषबाजी करीत न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतचा २५-१० असा पराभव केला आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. विजेत्या-उपविजेत्यांना भेटवस्तू व स्ट्रायकरसह पुरस्काराने कॅरमप्रेमी प्रमोद पार्टे व विजय नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या शालेय कॅरमपटूसह ४९ खेळाडूंच्या सहभागाने दादर-पश्चिम येथील सिबीइयू सभागृहात चँम्पियन कॅरम बोर्डवर रंगलेल्या स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात प्रसन्न गोळेने महिला मंडळ शाळेच्या विराज बर्वेचे आव्हान २५-४ असे तर आर्यन राऊतने पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या सारा देवनचे आव्हान २५-४ असे संपुष्टात आणले आणि अंतिम फेरीत धडक दिली. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, एसकेकेई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले. पंचाचे कामकाज चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, अर्जुन कालेकर, संतोष जाधव, अविनाश महाडिक आदींनी यशस्वीपणे केले.




