महत्वाच्या सामन्यातील चांगली कामगिरी लक्षवेधी ठरते – वेंगसरकर
महत्वाच्या सामन्यातील चांगली कामगिरी लक्षवेधी ठरते - वेंगसरकर

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 23/12/2025 📞 9004379946

मुंबई,( NHI@24.COM) :: “महत्वाच्या सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी केलीत तर ती सर्वांचे लक्ष वेधून घेते” असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे. माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर संपन्न झालेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. दिलीप वेंगसरकर फौंडेशन आयोजित या स्पर्धेत कामोठे येथील करण क्रिकेट अकादमी संघाने चेंबूरच्या अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघावर १३६ धावांनी मात करून विजेतेपद पटकावले. शतकवीर आरव सिंग (नाबाद १०७) हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या स्पर्धेत एकूण सहा शतकी खेळी पाहायला मिळाल्या.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या करण क्रिकेट अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांत ८ बाद १९७ धावांचे लक्ष्य उभारले. आरव सिंग याने ८७ चेंडूत नाबाद १०७ धावा करताना १७ चौकार लगावले. त्याने श्लोक कवाडे (२१) याच्या साथीने सहाव्या विकेट साठी ४६ धावांची तर नवव्या विकेट साठी चिन्मय लोकरे याच्यासह ४९ धावांची अभेद्य भागीदारी रचताना शतकी मजल गाठली. अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या वतीने कार्तिक वाघेला (४१ धावांत २), अनिश विद्युत (२० धावांत २) आणि विदेश दोशी (३७ धावांत २ ) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना अचिव्हर्स किकेत अकादमी संघाचा २१.५ षटकांत केवळ ६१ धावांत खुर्दा उडाला. आरव राजपूत (१०) आणि कार्तिक वाघेला (१७) यांनाच दोन आकडी मजल मारता आली. राजवीर पाटील (१६ धावांत ३), स्पर्श संगारे (११ धावांत ३), पियुष दांडेकर (८ धावांत २) आणि जिग्नेश पाटील (० धावांत २) यांनी टिच्चून गोलंदाजी करून संघाला दमदार विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आरव सिंग याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून रिषभ बिस्वास (२९३ धावा) याला गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून कारण क्रिकेट अकादमीच्याच राजवीर पाटील (१० बळी) याला तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या मोईन कुरेशी याला गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – करण क्रिकेट अकादमी – ३५ षटकांत ८ बाद १९७ ( आरव सिंग नाबाद १०७, श्लोक कवाडे २१, लीला संघवी १३, रिषभ बिस्वास १४, राजवीर पाटील १४; कार्तिक वाघेला ४१ धावांत २ बळी, अनिश विद्युत २० धावांत २ बळी, विदेश दोशी ३७ धावांत २ बळी) वि.वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – २१.५ षटकांत सर्वबाद ६१ (आरव राजपूत १०, कार्तिक वाघेला १७; पियुष दांडेकर ८ धावांत २ बळी, स्पर्श संगारे ११ धावांत ३ बळी, राजवीर पाटील १६ धावांत ३ बळी, जिग्नेश पाटील शून्य धावांत २ बळी) सामनावीर – आरव सिंग .




