खेल

प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा: गतविजेता दिलीप वेंगसरकर फाउंडेशनची विजयी सलामी

प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 17/12/2025 📞  9004379946

मुंबई,( NHI@24.COM)माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क मैदानावर सुरू झालेल्या प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमधील उद्घाटनीय सामन्यात गतविजेता दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा २०१ धावांनी मोठा पराभव करून विजयी सलामी दिली.

माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर साईनाथ स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने कर्णधार पूनम राऊत (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा, १२ चौकार) आणि चौथ्या क्रमांकावरील सिमरन शेखच्या (२४ चेंडूत ५१ धावा, ७ चौकार, २ षटकार) दमदार फलंदाजीमुळे निर्धारित २० षटकांत ४ बाद २२५ अशी मोठी धावसंख्या उभारली. सलामीची सारा सामंत (२३ चेंडूंत ४० धावा, ८ चौकार) आणि पाचव्या क्रमांकावरील मंजिरी गावडे (२१ चेंडूंत ३९ धावा) यांनी चांगली साथ दिली.

प्रतिस्पर्धी संघाचे मोठे आव्हान साईनाथ स्पोर्ट्स क्लबला पेलवले नाही. त्यांचा डाव १२.४ षटकांत अवघ्या २४ धावांमध्ये आटोपला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा काढता आल्या नाहीत. मध्यमगती गोलंदाज अदिती सुर्वे (४ धावांत ३ बळी) तसेच रेश्मा नायक (५ धावांत २ बळी), रिद्धी ठक्कर (६ धावांत २ बळी) आणि फातिमा जाफर (३ धावांत २ बळी) यांनी अचूक मारा करत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनला मोठा विजय मिळवून दिला.

अन्य सामन्यात एमआयजी क्रिकेट क्लबने राजावाडी क्रिकेट क्लबला ९ विकेट राखून हरवले. राजावाडी क्रिकेट क्लबचे ८३ धावांचे माफक आव्हान एमआयजी क्रिकेट क्लबने एका विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीच्या वैभवी राजा हिने ५४ चेंडूंत नाबाद ४६ धावा फटकावीत १६व्या षटकाला विजयावर शिक्कामोर्तब केला.

मध्य रेल्वे खेळपट्टीवर भामा क्रिकेट क्लबने पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनवर ३३ धावांनी मात केली. विजयी संघाच्या सलामीवीर महेक पोकर (६५ चेंडूंत ८६ धावा) आणि वृषाली भगत (६० चेंडूत नाबाद ७२) चमकल्या. माटुंगा जिमखाना येथे झालेल्या लढतीत डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने माटुंगा जिमखान्याचा २३ धावांनी पराभव केला. मधल्या फळीतील खुशी (२४ चेंडूत नाबाद ३७) आणि उन्नती नाईक (२९ चेंडूत नाबाद ४३) यांची सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची अभेद्य भागीदारी डॅशिंग स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी उपयुक्त ठरली..

तत्पूर्वी उद्घाटनप्रसंगी अभिनेता कुणाल विजयकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, डॉ. नंदिता पालशेतकर, क्रिकेटप्रेमी प्रदीप पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!