कर्करोगावरील उपचारांसाठी केवळ वय हा निकष असू शकत नाही – अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे मत; जेष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू.
या क्लिनिकमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, जेरियाट्रिशियन, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ आणि इतर सहाय्यक तज्ज्ञांची बहु-विशेषज्ञ टीम एकत्र काम करणार आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 08/09/2026 (8850212023)
नवी मुंबई (NHI24): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने जेष्ठ नागरिकांसाठी समर्पित कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू करून नवी मुंबईतील खाजगी आरोग्य क्षेत्रात जेष्ठांसाठी विशेष कर्करोग सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्यक्तीचे वय हे नेहमीच त्याच्या शारीरिक तंदुरुस्ती, स्वावलंबन किंवा कठोर उपचार सहन करण्याच्या क्षमतेचे प्रतिबिंब नसते. अशक्तपणा, पोषणाची स्थिती, मानसिक आरोग्य, आधीपासून असलेले इतर आजार, औषधांचा भार आणि कौटुंबिक व सामाजिक आधार यांसारखे अनेक घटक उपचारांच्या निर्णयावर आणि त्याच्या परिणामांवर मोठा प्रभाव टाकू शकतात. भारतातील एकूण कर्करोगाच्या रुग्णांमध्ये जवळपास 2 पैकी 1 रुग्ण आज 60 वर्षांवरील आहे, असा अंदाज आहे. ही आकडेवारी जेष्ठांसाठी विशेष कर्करोग सेवेची गरज किती वाढली आहे, हेच अधोरेखित करते.
भारताची लोकसंख्या आता वृद्ध होत आहे, अनेक कुटुंबांना आपल्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या कर्करोगाच्या निदानाला सामोरे जावे लागत आहे. मात्र एकाच वयाच्या आणि एकाच प्रकारचा कर्करोग असलेल्या दोन व्यक्तींची उपचार सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. 80 वर्षांची एक सुदृढ आणि स्वावलंबी व्यक्ती प्रमाणित उपचार सुरक्षितपणे घेऊ शकते, तर 65 वर्षांच्या अशक्त व्यक्तीला उपचारांमध्ये बदल, उपचारांपूर्वीची विशेष तयारी किंवा अधिक सहाय्याची गरज भासू शकते.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रोफेसर आणि लीड कन्सल्टंट डॉ. तेजिंदर सिंह म्हणाले, “येथे उपचारासाठी येणाऱ्या एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण 60 वर्षांवरील असतात. जेष्ठ रुग्णांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी एकच साचेबद्ध पद्धत असू शकत नाही. रुग्ण कीमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा शस्त्रक्रियेसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, हे केवळ वयावरून ठरवता येत नाही. रुग्णाचे एकूण आरोग्य, स्वावलंबन, पोषण स्थिती, मानसिक क्षमता, इतर व्याधी आणि उपचारांबाबतच्या त्याच्या स्वतःच्या अपेक्षा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक जेष्ठ रुग्णाला योग्य तीव्रतेचे योग्य उपचार मिळावेत आणि प्रत्येक निर्णयात त्याच्या जीवनाची गुणवत्ता आणि सन्मान केंद्रस्थानी राहील, हे सुनिश्चित करणे हा आमचा उद्देश आहे.”
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या जेरियाट्रिक मेडिसिन कन्सल्टंट डॉ. सायली दामले म्हणाल्या:
“जेरियाट्रिक ऑन्कोलॉजी म्हणजे जेष्ठ रुग्णांना कमी उपचार देणे नव्हे. तर सुदृढ असूनही केवळ वयामुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांवर उपचार, आणि अशक्त असल्यामुळे अनावश्यक गुंतागुंत होऊ शकणाऱ्या रुग्णांवर गरजेपेक्षा जास्त उपचार होणे – या दोन्ही गोष्टी टाळणे हा त्यामागचा उद्देश आहे. वृद्धावस्थेतील सविस्तर मूल्यांकनामुळे आम्हाला धोके वेळीच ओळखता येतात, दूर करता येण्याजोग्या अडचणींवर उपाय करता येतो आणि रुग्णासाठी अधिक सुरक्षित व वैयक्तिकृत उपचार योजना तयार करता येते.” या एकत्रित मॉडेलमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना निदान आणि उपचार नियोजनापासून ते सहाय्यक सेवा आणि पाठपुराव्यापर्यंत कर्करोगाच्या संपूर्ण प्रवासात समन्वित उपचार मिळू शकणार आहेत.
जेष्ठ नागरिकांमधील कर्करोग उपचारांविषयी असलेले अनेक गैरसमज दूर करणे हाही या उपक्रमाचा उद्देश आहे. केवळ वाढते वय हे एखाद्या रुग्णाला कीमोथेरपी, शस्त्रक्रिया, इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीपासून आपोआप वंचित ठेवण्याचे कारण असू शकत नाही. त्याचबरोबर, रुग्णामध्ये अशक्तपणा किंवा इतर काही धोके आढळल्यास, पोषण सहाय्य, शारीरिक पुनर्वसन, औषधांचे सुसूत्रीकरण आणि इतर आजारांचे योग्य व्यवस्थापन यांसारख्या उपायांनी त्यावर मात करणे शक्य आहे.
जेष्ठ नागरिकांसाठीच्या या विशेष कर्करोग क्लिनिकचे शुभारंभ करुन नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने वयोमानानुसार वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पुराव्यावर आधारित, रुग्ण-केंद्री कर्करोग सेवेची आपली बांधिलकी अधिक दृढ केली आहे. हे क्लिनिक जेष्ठ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना कर्करोगावरील नियंत्रण, सुरक्षितता, स्वातंत्र्य, आराम आणि जीवनाची गुणवत्ता यांचा समतोल साधत अधिक माहितीपूर्ण उपचार निर्णय घेण्यास मदत करेल.
अपोलो हॉस्पिटल्सबद्दल
1983 मध्ये डॉ. प्रताप रेड्डी यांनी चेन्नई येथे पहिले अपोलो हॉस्पिटल सुरू केले आणि अशाप्रकारे अपोलोने आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवली. आज अपोलो हे जगातील सर्वात मोठे एकात्मिक आरोग्यसेवा केंद्र आहे, अपोलोकडे 76 रुग्णालयांमध्ये 10,400 पेक्षा जास्त बेड, 7,113 पेक्षा जास्त फार्मसी, 308 क्लिनिक्स, 2,457 निदान केंद्रे, आणि 800 पेक्षा जास्त टेलिमेडिसिन केंद्रे आहेत. हे जगातील अग्रगण्य हृदयरोगाच्या केंद्रांपैकी एक असून अपोलोने 3,00,000 हून अधिक अँजिओप्लास्टी आणि 2,00,000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांना जगातील सर्वोत्तम उपचार मिळावेत म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि उपचार पद्धतींमध्ये संशोधन करुन आणि नाविन्यता आणून अपोलो सातत्याने गुंतवणूक करत आहे. अपोलो कुटुंबातील 1,20,000 सदस्य अतुलनीय वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणि जग आणखी सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध आहेत.




