
आंदेकर टोळीने नाना पेठेतच असा केला ‘गेम’
पुणे : पुण्यात ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरचा भडका उडाला आहे. मागील वर्षभरापासून सुडाने पेटलेल्या आंदेकर टोळीने वनराज आंदेकरचा खून करणाऱ्या आरोपी गणेश कोमकरचा मुलाचा गोळ्या झाडून खून केला आहे. गोविंद कोमकर असं मृत मुलाचं नाव आहे. आंदेकर टोळीने प्लॅनिंग करून सप्टेंबर महिन्यात वनराजच्या हत्येचा बदला घेतला असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक वनराज आंदेकरची त्याच्याच बहिणींच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. भावा – बहिणीतील मालमत्तेचा आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नाना पेठ परिसरातच ही घटना घडली आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी सुरू होती. आंदेकर टोळीने नाना पेठ परिसरात फिल्डिंग लावली होती. आरोपी गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी होता. त्याला मुलगा गोविंद कोमकर हा नाना पेठ परिसरात आला होता. त्यानंतर आंदेकर टोळीचे शुटर्स आले आणि त्यांनी गोविंदवर बेछुट गोळीबार केला. आंदेकर टोळीच्या शुटर्सने गोविंदवर तीन गोळ्या झाडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.