मंगलाताई अडसूळ स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत हिरण्मयी कुलकर्णी विजेती
मंगलाताई अडसूळ स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत हिरण्मयी कुलकर्णी विजेती

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 09/03/2026 📞 9004379946
मुंबई NHI.COM(M) आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ स्मृती चषक १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत हिरण्मयी कुळकर्णीने साखळी सर्व ५ सामने जिंकून विजेतेपद पटकाविले. हिरण्मयीने १३ वर्षाखालील गटात देखील अपराजित राहून दुहेरी अजिंक्यपदाला गवसणी घातली. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत हिरण्मयी कुळकर्णीने पहिल्या पटावर अथर्व दाभोळकरच्या राजाला २६ व्या मिनिटाला शह देत सर्वाधिक पाचवा गुण वसूल केला. क्रीडापटू प्रमोद पार्टे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना तसेच त्यांच्या मातांना देखील पुरस्कारासह गौरविण्यात आले.
परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात १४ वर्षाखालील गटात मुलींमध्ये हिरण्मयी कुळकर्णीने (५ गुण) प्रथम, मानस्वी शिरसाटने (२ गुण) द्वितीय, आराध्या महाडिकने (२ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये गोकर्ण औटीने (४ गुण) प्रथम, कार्तिकेय सावंतने (४ गुण) द्वितीय, विरेन चेट्टीने (३ गुण) तृतीय; ११ वर्षाखालील गटात मुलींमध्ये जुई गदाडेने (३ गुण) प्रथम, अनिश्का बियाणीने (३ गुण) द्वितीय, शानवी जगतापने (२ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये प्रणील मुजुमदारने (४ गुण) प्रथम, जितेज गाडगेने (४ गुण) द्वितीय, आयांश पाटीलने (३.५ गुण) तृतीय तर ८ वर्षाखालील गटात मुलींमध्ये साध्या जाधवने (४ गुण) प्रथम, रितिका गेडामने (२.५ गुण) द्वितीय आणि मुलांमध्ये मोहित सावंतने (४ गुण) प्रथम, साहस जाधवने (४ गुण) द्वितीय, स्मित लोकेने (३ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूनी दर्जेदार खेळ करून स्पर्धेत रंगत आणली.




