को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत महानगर बँक अजिंक्य
को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत महानगर बँक अजिंक्य

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 16/02/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत प्रफुल पवारची (१७ धावा व ३ धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी व सांघिक खेळाच्या बळावर जीएस महानगर को-ऑप. बँकेने गतविजेत्या बलाढ्य हिंदुस्थान को-ऑप. बँकेला ८ धावांनी पराभूत करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. निर्णायक षटकांमध्ये मधल्या फळीची फलंदाजी ढासळल्यामुळे हिंदुस्थान बँकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले.
दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडियमवर जीएस महानगर को-ऑप. बँक विरुध्द हिंदुस्थान को-ऑप. बँक यामधील अंतिम लढत अटीतटीची झाली. नाणेफेक जिंकून महानगर बँकेने प्रथम फलंदाजी करतांना आदित्य सावंत (७ धावा) व समीर हाडवळे (७ धावा) यांनी १७ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर तिसरे षटक घेऊन येणाऱ्या विजय जगतापने (८ धावांत २ बळी) महानगर बँकेची ३ बाद १९ धावा अशी बिकट अवस्था केली. परंतु प्रफुल पवार (१७ धावा) व विलास घेमुड (नाबाद ७ धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी २५ धावांची मोठी भागीदारी केल्यामुळे महानगर बँकेने मर्यादित ५ षटकात ४ बाद ४४ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर उभे केले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना कुलदीप पवार (१० धावा) व अनिरुध्द (७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे हिंदुस्थान बँकेने डावाच्या मध्यापर्यंत २ बाद ३० धावा अशी विजया समीप मजल गाठली होती. परंतु तिसरे षटक घेऊन येणाऱ्या प्रफुल पवारने ३ धावांत २ बळी घेतल्यामुळे महानगर बँकेने हिंदुस्थान बँकेचा डाव मर्यादित ५ षटकामध्ये ६ बाद ३६ धावसंख्येवर थोपविला आणि ८ धावांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. राज्यातील सहकारी बँकाच्या ३२ संघांमधील क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा बँक व अपना बॅंक संघांनी उपांत्य उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, ठाणे सरचिटणीस प्रदीप पाटील, खजिनदार प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, नितीन गवादे आदी पदाधिकारी कार्यरत होते.



