हवामान बदलासाठी महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा पुढाकार
हवामान बदलासाठी महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा पुढाकार

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 01/02/2026 📞 8850212023
काळा घोडा कला-महोत्सवात सादरीकरण, स्व-अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी संगीत नाटक सादर
मुंबई NHI24.COM(M) – आपल्या उत्तम सादरीकरणाने गेल्या वर्षी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर, मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी प्रतिष्ठित ‘काळा घोडा कला महोत्सवा’ त परत एकदा सादरीकरणास सज्ज झाले आहेत. या वर्षी, 10 ते 13 वयोगटातील 100 हून अधिक विद्यार्थी ‘द व्हिस्परिंग वूड्स ईशान्स जर्नी’ नावाचे एक इंग्रजी संगीत नाटक सादर करणार आहेत. आवड म्हणून निसर्गाचे निरीक्षण करणे ते त्याची सक्रियपणे जबाबदारी घेणे, असा या नाटकाचा प्रवास आहे. या अनोख्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना नेपथ्य, नाट्यकला आणि अभिनय क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मौल्यवान शिक्षण मिळाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्सच्या जगाची ओळख झाली.
हे संगीत नाट्य म्हणजे ‘पहले अक्षर फाउंडेशन’ द्वारे (PAF) चालवल्या जाणाऱ्या एका वर्षभराच्या नाट्य-आधारित शिक्षण कार्यक्रमाचे सार आहे. भाषा विकास आणि स्व-अभिव्यक्तीसाठी ते सादरीकरणाचा एक साधन म्हणून वापर करतात. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात एक आखीव अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, ज्यात संवाद कौशल्यासोबतच, आत्मविश्वासाने इंग्रजीमधील सादरीकरणाचा समावेश आहे. तसेच कथाकथन, संगीत आणि हावभावांद्वारे सर्जनशीलता जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. “नाट्यकला हे वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी एक शक्तिशाली साधन आहे, असा आमचा विश्वास आहे. विशेषतः जेव्हा भाषा शिक्षणासाठी म्हणून त्याचा उपयोग केला जातो, तेव्हा तर ती अधिकच प्रभावी असते. विद्यार्थी इंग्रजीमध्ये स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करायला शिकतात, त्यांची शब्दसंपदा वाढते, उच्चार सुधारतात आणि त्यांना भाषेची सखोल समज येते. यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक आत्मविश्वास निर्माण होतो.”
“मी सहसा माझा मोकळा वेळ रोब्लॉक्स खेळण्यात घालवतो, त्यामुळेच खऱ्या रंगमंचावर उभे राहणे हे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन जग होते,” असे नारियलवाडी शाळेतील पाचवीच्या वर्गात शिकणारा शौर्य म्हणतो. “माझं इंग्रजी चांगलं आहे, पण अभिनयाने मला एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास शिकवला. ही माझी पहिलीच वेळ असली आणि मला थोडं दडपण वाटत असलं तरी, मला भीती वाटत नाही. माझे आई-वडील मला तिथे रंगमंचावर पाहतील, अशी मला अशा आहे. कारण माझे स्वप्न अभिनेता बनण्याचे आहे, असे मला वाटते आहे.”
गेल्या वर्षीच्या नाटकाने प्रेक्षकांना प्राण्यांच्या नजरेतून निसर्ग बघायला शिकवलं होतं. तर ‘द व्हिस्परिंग वूड्स’ हे नाटक निसर्ग रक्षण आणि संवर्धनाच्या सक्रिय जबाबदारीवर लक्ष केंद्रित करते. जंगले आणि शहरांमधून प्रवास करताना वेगवेगळ्या गोष्टी शोधणाऱ्या ईशानच्या प्रवासातून हे नाटक आपल्यासमोर येते. रोजच्या जगण्यातल्या लहान-सहान गोष्टीतून शहरीकरणाचे परिणाम कसे कमी होऊ शकतात आणि वन्यजीवनाशी असलेले आपले नाते कसे पुन्हा प्रस्थापित होते, हे या नाटकातून आपल्या समोर येते.



