एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत भरत, स्वरा, साराची विजयी सलामी
एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत भरत, स्वरा, साराची विजयी सलामी

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 02/02/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विविध जिल्ह्यातील शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, आर.बी.शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीची सारा देवन, पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे, व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर आदींनी सलामीचे सामने जिंकले. भरत सावंतने सुरुवातीपासून आघाडी घेत उशिरा सूर सापडलेल्या दिवीत छेडाचे आव्हान १०-८ असे संपुष्टात आणले. स्पर्धेचे शानदार उद्घाटन उद्योजक सुशील शेट्ये, क्लबचे पदाधिकारी विजय येवलेकर, सुनील पाटील, महेश शेट्ये, राजन गुप्ता, चंद्रकांत करंगुटकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील माहीम ज्यूवेनाइल स्पोर्ट्स क्लबमधील स्वरा मोहिरे विरुध्द देविका जोशी यांची लढत देखील अटीतटीमध्ये रंगली. डावाच्या मध्यापर्यंत दोलायमान झालेल्या चूरशीच्या सामन्यात स्वरा मोहिरेने ११-९ अशी बाजी मारली. अन्य सामन्यात सारा देवनने अनन्या पाध्येला १३-५ असे, दैविक जैनने अद्वैत महाडिकला २०-६ असे, प्रसन्न गोळेने ओमकार मोटेला २५-२ असे, तनया दळवीने वेदिका पोमेंडकरला १४-५ असे, उमैर पठाणने दक्ष संघवीला १३-३ असे तर ग्रीष्मा धामणकरने आरव आंजर्लेकरला २५-० असे पराभूत करून पहिली फेरी जिंकली. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील नामवंत ४२ शालेय खेळाडूंमध्ये एमजेएससी ट्रॉफीसाठी निकराच्या लढती सुरु आहेत.



