खेल

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता; जैतापूरचा आर्यन राऊत उपविजेता

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता; जैतापूरचा आर्यन राऊत उपविजेता

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/02/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M)

माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्य स्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. १०-९ अशी आघाडी घेणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतला निर्णायक बोर्डातील अप्रतिम फिनिशद्वारे १५-९ असे पराभूत केले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. परिणामी शेवटचा बोर्ड हातचा निसटल्यामुळे आर्यन राऊत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक यशवंत किल्लेदार, क्लबचे पदाधिकारी सुनील पाटील व महेश शेट्ये, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

शिवाजी पार्क येथील एमजेएससी स्पर्धेमधील उपांत्य फेरीत आर्यन राऊतने शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेचे आव्हान १२-७ असे तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवचे आव्हान २३-० असे संपुष्टात आणून अंतिम फेरीत धडक दिली होती. विविध जिल्ह्यातील ४२ शालेय खेळाडूंमध्ये होली फॅमिली हायस्कूल-अंधेरीची चैतन्या पोमेंडकर, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीचे प्रसाद माने व शिवांश मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, सीएनएम स्कूलचे अर्णव शाह व दैविक जैन, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची सारा देवन यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार स्ट्रायकरसह पटकाविला. स्पर्धेतील सहभागी शालेय खेळाडूंना रुपये पाचशे विशेष पुरस्कार देण्यात आला. शालेय कॅरमपटूंना सातत्याने सर्वतोपरी प्रोत्साहन मोफत उपक्रमाने दिल्याबद्दल पालक व शिक्षक वर्गाने संयोजकांच्या मोफत उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!