हृदयरोग उपचारांसाठी परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलची नवी रेनल डिनर्व्हेशन सुविधा
हृदय व मूत्रपिंडाच्या गंभीर गुंतागुंतींचा धोका कमी करण्याचा करणार प्रयत्न

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 24/02/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटल ने मेडट्रॉनिक इंडियासोबत हातमिळवणी करत उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी आधुनिक अशा रेनल डेनरव्हेशन थेरपी सेंटरचा शुभारंभ केला आहे. बऱ्याचदा अनेक औषधं घेऊनही ज्या रुग्णांचा वाढलेला रक्तदाब कमी होत नाही अशा रुग्णांना उपचारांमध्ये विशेष मदत करण्यासाठी हे नवीन केंद्र तयार करण्यात आले आहे. या सुविधेमध्ये रुग्णांची सखोल तपासणी, समुपदेशन, औषधांचे योग्य नियोजन तसेच पात्र रुग्णांसाठी रेनल डिनर्व्हेशन थेरपी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजारांचा धोका कमी करण्याचा प्रयत्न या केंद्रामार्फत केला जाणार आहे.
अनुभवी तज्ज्ञ या केंद्राचे नेतृत्व करणार असून यामध्ये संचालक- हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता आणि संचालक- नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भरत शाह, वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. एम. रेड्डी, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. प्रशांत राजपूत यांचा समावेश आहे. हे केंद्र उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी व्यापक स्वरुपात व अचुक व्यवस्थापन सुनिश्चित करेल.
आधुनिक जीवनशैली, तणावाची उच्च पातळी, आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि वाढत्या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. वेळीच निदान आणि व्यवस्थापनाने यावर मात करणे शक्य आहे. सतत डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत दुखणे, दम लागणे किंवा अंधुक दृष्टी यासारख्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते जोपर्यंत ही गुंतागुंत वाढत नाही तोपर्यंत याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. उच्च रक्तदाब हा जगभरात अकाली मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि भारतात हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत निर्माण करण्यास एक प्रमुख कारण ठरत आहे. औषधांची उपलब्धता असूनही, निदानास होणारा विलंब, अनियमित फॉलो-अप, जागरूकतेच्या अभावामुळे ताण, लठ्ठपणा, अनियंत्रित मीठ सेवन आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेक रुग्णांना त्यांचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये, अनेक औषधे घेतल्यानंतरही रक्तदाब उच्च राहतो, ज्याला प्रतिरोधक उच्च रक्तदाब म्हणून ओळखले जाते.
या विशेष रेनल डिनर्व्हेशन थेरपी सेंटरच्या माध्यमातून ग्लेनईगल्स हॉस्पिटल हे अवघड आणि औषधांनीही नियंत्रणात न येणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अधिक प्रभावी उपचार व्यवस्थापन मजबूत करणार आहे. या केंद्रात रुग्णांची नियोजनबद्ध तपासणी, समन्वयित उपचार पद्धती आणि प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आराखडा तयार केला जाणार आहे.
या उपचार प्रक्रियेत हृदयरोग तज्ज्ञ, मूत्रपिंड तज्ज्ञ आणि अंतर्गत औषधोपचार तज्ज्ञ एकत्रित काम करून रुग्णांना सर्वांगीण आणि दीर्घकालीन उपचार पुरवतात. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सातत्याने होणारे वैद्यकीय प्रशिक्षण याच्या मदतीने रुग्ण शिक्षण, जीवनशैलीविषयक मार्गदर्शन, औषधांचे योग्य नियोजन आणि नियमित फॉलो-अपवर विशेष भर दिला जाणार आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश रुग्णांचा रक्तदाब दीर्घकाळ नियंत्रणात ठेवणे आणि त्यातून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदयविकारामुळे होणारे हार्ट फेल्युअर, मूत्रपिंड निकामी होणे तसेच दृष्टी कमी होणे यांसारख्या गंभीर गुंतागुंतींचा धोका कमी केला जाण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता म्हणाले, रेझिस्टंट हायपरटेन्शन हा आजार अनेकदा लक्षणं न आढळून येता वाढतो, मात्र तो अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदय निकामी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेक रुग्ण औषधं घेत असले तरी त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येत नाही. अशा निवडक रुग्णांसाठी रेनल डिनर्व्हेशन थेरपी हा एक अतिरिक्त आणि प्रभावी उपचार पर्याय ठरतो.
ते पुढे सांगतात की, ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये आम्ही जीवनशैलीतील बदल, योग्य औषधोपचार आणि प्रगत इंटरव्हेन्शनल थेरपी यांचा एकत्रित वापर करून दीर्घकालीन रक्तदाब नियंत्रण आणि भविष्यातील गुंतागुंत टाळण्यावर भर देतो.
ग्लेनईगल्स हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भरत शाह पुढे सांगतात की, अनियंत्रित उच्च रक्तदाबाचा परिणाम केवळ हृदयावरच नाही, तर मूत्रपिंडावरही गंभीर परिणाम करतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास मूत्रपिंडांची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि क्रॉनिक किडनी डिसीज उद्भवण्याची शक्यता आहे.
डॉ शाह पुढे म्हणाले, या विशेष केंद्रामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांचे वेळीच निदान करत त्यांना नियोजनबद्ध आणि बहुवैद्यकीय उपचार पुरवता येतील. ठराविक रुग्णांमध्ये रक्तदाब वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या अतिसक्रिय नसांवर उपचार करणारी रेनल डिनर्व्हेशन थेरपी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे आरोग्य सुधारुन दीर्घकालीन अवयवांचे नुकसान टाळता येईल.
उच्च रक्तदाबाच्या (हायपरटेन्शन) उपचारांमध्ये उशिरा होणारे निदान, उपचार होणारा विलंब आणि नियमित फॉलो-अपचा अभाव ही आजही मोठी आव्हाने असल्याचे प्रतिपादन ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन चेवले यांनी केले. मेडट्रॉनिकसोबत हातमिळवणी करत रेसिस्टंट हायपरटेन्शनसाठी अधिक नियोजनबद्ध आणि अतुक उपचार पद्धती राबवता येणार आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ, प्रगत तंत्रज्ञान आणि रुग्ण-केंद्रित उपचार मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे एकत्ररित्या दीर्घकालीन रक्तदाब नियंत्रण आणि हृदयविकाराशी संबंधित गुंतागुंतींचा धोका कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे,असेही डॉ चेवले यांनी स्पष्ट केले.
मनदीप सिंग कुमार(व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष, मेडट्रॉनिक इंडिया) यांनी सांगितले की, रेसिस्टंट हायपरटेन्शन ही हृदयरोग उपचारांतील वाढती आणि दुर्लक्षित अशी समस्या आहे. या आजाराचा वाढता भार पाहता उपचार पद्धतींचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
ते पुढे सांगतात की, मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटलसोबत काम करताना प्रत्यक्ष रुग्णसेवेत ठोस परिणाम साधता येतील. रुग्णांमध्ये जनजागृती वाढवणे, निदान आणि उपचारांसाठी अधिक समन्वयित व संरचित दृष्टिकोन विकसित करणे हा या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे अवघड आणि नियंत्रणात न येणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यास मदत होईल. मेडट्रॉनिकमध्ये रुग्णांच्या वेदना कमी करणे, रुग्णाचे आरोग्य पुर्वपदावर येण्यासाठी तसेच रुग्णाचे आयुष्य वाढविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.
हृदयरोग उपचारांसाठी परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलची नवी रेनल डिनर्व्हेशन सुविधा



