मालाड प्राध्यापक हत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट! “ही हत्या नाही, अपघात …,” आरोपीच्या वकिलाच्या युक्तिवादाने मोठा ट्विस्ट
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/01/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) मालाड येथील प्राध्यापक आलोक सिंग यांच्या हत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अटक केलेल्या ओंकार शिंदेच्या वकिलाने न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे की, “ही हत्या नाही, अपघात असू शकतो,” तसेच आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग नसल्याचा दावा केला. यामुळे हत्येच्या आरोपावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कोर्टात पुढील सुनावणीत हे प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता आहे.

मुंबईतील प्रतिष्ठीत एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची काल रेल्वे प्लॅटफॉर्मवर हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून संशयित आरोपी ओमकार शिंदे याला अटक करण्यात आली. त्यानंतर ओमकार शिंदेला कोर्टात आणण्यात आलं. यावेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलाने तर ओमकारने ही हत्या केलीच नसल्याचा दावा केला आहे. उद्या लोकल ट्रेनमध्ये कुणीही चिरडलं तर तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल आरोपीच्या वकिलाने केला आहे. तसेच आरोपीच्या अंगावर किंवा कपड्यावर रक्ताचे डाग नव्हते. सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे आरोपीने हत्या कशी केली? असा सवालच आरोपीच्या वकिलाने केल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
मालाड हत्या प्रकरणातील आरोपी ओमकार शिंदेला बोरिवलीच्या सुट्टीच्या न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलाने कोर्टात बाजू मांडली. गुन्ह्यातील हत्यार शोधणे बाकी आहे. आरोपी आणि मयत एकाच परिसरात राहतात. त्यामुळे त्यांच्यात काही पूर्वीचे वाद आहेत का? हे तपासायचे आहे. आम्हाला 7 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे, असं सरकारी वकिलाने सांगितलं.
दरम्यान, आरोपीच्या वकिलाने मीडियाशीही संवाद साधला. वाद विवाद होणे, हत्या होणे हे दोन वेगळे भाग आहेत. गर्दीत किरकोळ वादावादी झाली. फिर्यादीने एफआयआर दिला आहे. तो साक्षीदार आहे. या व्यक्तीने मारलाय, असं त्यात म्हटलं नाही. मला फक्त काही तरी मारलं. एवढंच वाक्य आहे. फिर्यादी आरोपीच्या मागे पळत गेला म्हणून आरोपी पळालेला आहे. जर हत्यार असतं तर हत्यार घेऊन पळाला असता. आरोपीच्या अंगावर, कपड्यावर रक्ताचे डाग नाहीत हे सीसीटीव्हीत दिसतं. लोकलमध्ये एकाच घरातील व्यक्ती नसतात. कडिया काम करणारे, इतर कामगार असतात. त्यांच्यासोबत अवजारं असतात. अवजारं गर्दीत लागू शकतात. आरोपीकडे हत्यार असते तर ते आरोपीच्या हातात किंवा घटनास्थळी मिळाले असते, असं आरोपीच्या वकिलाने म्हटलंय.
डोळ्यात पाणी, कंठ दाटला! शब्द फुटेना… प्राध्यापकाच्या हत्येने नातेवाईक हतबल; थेट पोलिसांवरच…
कॉलेज आणि घर एवढंच विश्व असलेल्या प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या करण्यात आल्याने सर्वचजण हादरून गेले आहेत. कुणाशीही कधीही वाद न घालणारा, शांत आणि मितभाषी असलेल्या प्राध्यापकाच्या बाबत असं होऊच कसं शकतं? असा सवाल केला जात आहे. आलोक सिंग यांच्या हत्येचं वृत्त ऐकून त्यांचे मित्र मंडळी आणि नातेवाईकही सुन्न झाले आहेत. त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासा झाला आहे. काय बोलावं? तेच कळत नाही. कंठ दाटून गेलाय, शब्द फुटत नाही, फक्त डोळ्यात पाणी आहे… अशी अवस्था या नातेवाईकांची झाली आहे. मात्र, या नातेवाईकांनी पोलिसांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
आलोक सिंग हे महाविद्यालयात प्राध्यापक होते. अत्यंत हुशार आणि मनमिळावू प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यार्थी प्रिय असे ते प्राध्यापक होते. पण मालाड रेल्वे स्थानकात भर गर्दीत त्यांचा खून झाल्याने त्यांचे नातेवाईक हादरून गेले आहेत. आलोक यांच्या कुटुंबीयांनी या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ला झाला तेव्हा पोलीस काय करत होते? पोलीस कुठे होते? रेल्वे स्थानकावर पोलिसांसाठी एक बेंच असतो, त्या बेंचवर पोलीस नव्हते, मग बेंच कशासाठी ठेवले? आरोपी सर्वांसमोरून पळून जात होता, त्याला कुणीच कसं आडवलं नाही? आलोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत का मिळाली नाही? असे सवाल प्रवासी आणि आलोक यांचे नातेवाईक करत आहेत.


