GJEPC चा मुंबईत दोन ठिकाणी जागतिक B2B दागिन्यांचा मेळावा; प्रदर्शनात 12 आंतरराष्ट्रीय खरेदीदार प्रतिनिधी मंडळे सहभागी होणार
GJEPC चा मुंबईत दोन ठिकाणी जागतिक B2B दागिन्यांचा मेळावा

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 06/01/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) या आठवड्याच्या शेवटी मुंबईतील दोन प्रमुख ठिकाणी आयोजित होणाऱ्या, वर्षातील पहिल्या जागतिक B2B दागिन्यांचा मेळावा – IIJS भारत – सिग्नेचर 2026च्या 18व्या आवृत्तीसाठी सज्ज आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आपल्या जागतिक दागिन्यांच्या कॅलेंडरची सुरुवात करणार आहे. हे प्रदर्शन दोन ठिकाणी सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (JWCC) येथे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान आणि IGJME भारत – सिग्नेचर 2026 या यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान प्रदर्शनासोबत 9 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (NESCO) येथे, आयोजित केले जाईल.
आयआयजेएस म्हणजे रत्न आणि दागिने क्षेत्रातील व्यवसायाला समानार्थी असलेले एक प्रतिष्ठित नाव आहे. वर्षातील पहिलाच मेळावा आयोजित करणारे IIJS भारत – सिग्नेचर हे मार्केटचा दृष्टिकोन ठरवते. आणि यातूनच आगामी वर्षासाठी सोर्सिंग, डिझाइन आणि व्यवसायाची दिशा ठरते. 1.25 लाख चौरस मीटर परिसरात आयोजित या प्रदर्शनात 3,300 हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून 1,600 हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील आणि भारतातील 800 हून अधिक शहरांमधून 25,000 पेक्षा जास्त व्यापारी खरेदीदारांचे, तसेच जगभरातील 40 देशांमधून 1,400 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचे स्वागत केले जाईल. सोने, हिरे, चांदी, नैसर्गिक सुटे हिरे, रंगीत रत्ने, कुटूर दागिने आणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे, तसेच यंत्रसामग्री आणि संबंधित विभागांसह एका सर्वसमावेशक सोर्सिंग वातावरणाचा खरेदीदारांना अनुभव घेता येईल.
प्रदर्शनात 12 आंतरराष्ट्रीय खरेदीदार प्रतिनिधी मंडळे देखील सहभागी होणार आहेत, ज्यामुळे एक जागतिक सोर्सिंग प्लॅटफॉर्म म्हणून आयायजेएस भारत – सिग्नेचरचे स्थान अधिक भक्कम करेल. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय प्रदर्शक देखील सहभागी होतील, ज्यात अमेरिका, यूएई, हाँगकाँग, जपान, थायलंड, तुर्की आणि जर्मनी येथील 21 दागिन्यांच्या कंपन्यांचे 43 स्टॉल्स, तसेच आंतरराष्ट्रीय यंत्रसामग्रीचे 4 आणि संबंधित कंपन्यांच्या 7 स्टॉल्सचा समावेश आहे.व्यावसायिक गती आणि उद्योगाची आवड दर्शवत, या प्रदर्शनात 368 हून अधिक नवीन कंपन्या सहभागी होणार आहेत, ज्यांनी एकत्रितपणे 472 स्टॉल्स घेतले आहेत. IIJS भारत – सिग्नेचरचा सातत्यपूर्ण विस्तार आणि प्रासंगिकता यातून अधोरेखित होते.
श्री.किरीट भन्साळी, अध्यक्ष, जीजेईपीसी म्हणाले,“वर्षातील पहिले जागतिक दागिने व्यापार प्रदर्शन म्हणून, आयआयजेएस भारत – सिग्नेचर उद्योग क्षेत्राची दिशा ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतातील रत्न आणि दागिने क्षेत्र जागतिक स्तरावरील विश्वास दृढ करण्यासोबतच, मार्केटमधील विस्तार आणि गुणवत्ता, नावीन्य तसेच जबाबदार कार्यपद्धतींद्वारे दीर्घकालीन स्पर्धात्मकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आयआयजेएस याच व्यापक ध्येयाच्या हेतूने वाटचाल करते आहे.”
श्री.शौनक पारिख, उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रदर्शनांचे संयोजक, जीजेईपीसी म्हणाले,“आयआयजेएस भारत सिग्नेचर येथूनच या क्षेत्राच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. दोन ठिकाणी प्रदर्शन भरवण्याच्या कल्पनेमुळे आम्हाला प्रदर्शकांची वाढती मागणी पूर्ण करता येते, तसेच खरेदीदारांना एक वेगळा अनुभव देता येतो. खास तयार करण्यात आलेले विभाग, माहिती देणारी व्यवस्था ते तंत्रज्ञान-आधारित सेवांपर्यंत, हे प्रदर्शन व्यवसायांना वर्षाची सुरुवात स्पष्टता आणि आत्मविश्वासाने करण्यास मदत करते.”




