Uncategorized

श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धेत मावळी, आंध्रा, एसआयईस, ज्ञानविकास शाळांची विजयी सलामी

कबड्डी स्पर्धेत मावळी, आंध्रा, एसआयईस, ज्ञानविकास शाळांची विजयी सलामी

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 16/12/2025 📞  9004379946

मुंबई,( NHI@24.COM) : श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत श्री मावळी मंडळ हायस्कूल-ठाणे, आंध्रा एज्युकेशन हायस्कूल-वडाळा, एस.आय.ई.एस. हायस्कूल-सायन, ज्ञान विकास हायस्कूल-कोपरखैराणे आदी मुलींच्या संघांनी सलामीचे सामने जिंकले. उद्घाटनीय चुरशीच्या सामन्यात मध्यंतराला १८-२३ अशा पिछाडीवर राहूनदेखील श्री मावळी मंडळ हायस्कूलने वरळीच्या जनता हायस्कूलचा ५०-३७ असा पराभव केला. उत्तरार्धात सानिका म्हात्रेच्या खोलवर चढाया व दिव्या पतेलच्या बहारदार पकडीच्या खेळामुळे मावळी हायस्कूलचा विजय सुकर झाला. सई भुवडने दमदार चढाया करूनही प्रारंभी आघाडी घेणाऱ्या जनता हायस्कूलला पराभवास सामोरे जावे लागले.

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सुरु झालेल्या मुलींच्या कबड्डी सामन्यात आंध्रा एज्युकेशन हायस्कूलची कप्तान गायत्री गुप्ताच्या आक्रमक चढाया रोखता न आल्यामुळे हॉलीक्रॉस हायस्कूलला ६०-६ असा मोठा पराभव पत्करावा लागला. एसआयईस हायस्कूलने एनकेइएस स्कूलवर ४०-११ असा विजय मिळविताना श्रेया गुप्ता व स्वरा भेरे चमकल्या. ज्ञान विकास हायस्कूलने सांघिक खेळाच्या बळावर मराठा हायस्कूलवर ४५-७ अशी बाजी मारली. शालेय मुलांच्या सामन्यात जनता हायस्कूलने हॉलीक्रॉस हायस्कूलचा ५२-४३ असा, आंध्रा एज्युकेशनने जवाहर विद्या भवनचा ३७-१० असा, एसआयईएस हायस्कूलने स्वामी विवेकानंद विद्यालयाचा ३९-३४ असा तर श्री गणेश विद्यालयाने मावळी हायस्कूलचा ५३-४८ असा पराभव करून पहिली फेरी जिंकली. स्पर्धेचे शानदार उद्घाटन समितीचे उपाध्यक्ष किरण पाटकर, विश्वस्त गुरुनाथ पांगम, विजय साखरकर, मयुरेश मोंडकर, डॉ.यशस भुरे, डॉ. अरुण भुरे, नरेंद्र गानू, डॉ. विजय शृंगारपुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!