उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा वित्त वर्ष २०३०पर्यंतचा १ लाख कोटी रुपयांच्या कर्जपुस्तकाचा आराखडा सादर
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा वित्त वर्ष २०३०पर्यंतचा १ लाख कोटी रुपयांच्या कर्जपुस्तकाचा आराखडा सादर

Posted By Anagha Sakpal 5 September2025
बंगळुरू, : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने २०३० या आर्थिक वर्षापर्यंत १ लाख कोटींच्या एकूण कर्जपुस्तकाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपला धोरणात्मक आराखडा जाहीर केला आहे. २०१७ मध्ये स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाज सुरू झाल्यापासून झालेल्या प्रगतीच्या पायावर हा आराखडा उभा आहे. ठेवींचा भक्कम पाया वाढवणे, कर्जउत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करणे आणि खर्च-केंद्रित कार्यपद्धतीद्वारे अधिक शाश्वत नफ्याचा पाया निर्माण करणे यावर या बँकेची वाढ आधारित आहे.
विविधतापूर्ण कर्जपुस्तक : ‘उज्जीवन’ने आपल्या कर्जांच्या पोर्टफोलिओमध्ये सातत्याने विविधता आणली आहे. सुरक्षित तारणाधारित कर्जांचे प्रमाण वित्त वर्ष २०१९ मध्ये १६ टक्के इतके होते. वित्त वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीअखेर ते ४६ टक्क्यांवर पोहोचले. पुढील टप्प्यात हे प्रमाण ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचा बँकेचा मानस आहे. यामध्ये परवडणारी गृहनिर्माण कर्जे, सूक्ष्म गहाणकर्जे, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठीची कर्जे, वाहनकर्जे, सोनेतरण कर्जे आणि कृषिकर्जे यांचा प्रमुख वाटा असेल. त्याचबरोबर ‘मिड कॉर्पोरेट’ क्षेत्रासाठी कर्जउत्पादने आणून उत्पादनश्रेणी वाढवण्याचीही योजना आहे. गटकर्जांवर आधारित मायक्रो बँकिंग हा बँकेच्या विस्ताराचा पाया आहे; मात्र ग्राहक वैयक्तिक कर्जांकडे वळत असल्याने बँक आपला वैयक्तिक कर्जपोर्टफोलिओही मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे.
ठेवींचा पाया : ‘उज्जीवन’ने ठेवीदारांचा स्थिर पाया उभारला आहे. वित्त वर्ष २०२६च्या पहिल्या तिमाहीअखेर एकूण ३८,६१९ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ७२ टक्के ठेवी या किरकोळ (कासा व मुदतीच्या) ठेवींमधून आहेत. कासा शिल्लक ९,३८१ कोटी रुपये इतकी असून, ती एकूण ठेवींच्या २४.३ टक्के आहे. वित्त वर्ष २०३० पर्यंत कासा ठेवींचा हिस्सा ३५ टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. या वाढीसाठी शाखांचे जाळे ७५२वरून सुमारे १,१५०पर्यंत वाढवणे, विस्तारित ग्राहकवर्गाला अधिक सेवा पुरवणे आणि आयपीओ-एएसबीए, म्युच्युअल फंड वितरण, पैसे पाठवण्याची सेवा आणि सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डे यांसारखी नवी उत्पादने उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
नफा क्षमता व जोखीम स्थिती : बँकेचा विस्तार होत असताना तिचे लक्ष तांत्रिक व डिजिटल पायाभूत संरचना अधिक सक्षम करणे, योग्य आकारमानाचा कर्मचारीवर्ग ठेवणे, कार्यकारी खर्चांचे नियोजनबद्ध नियंत्रण, उत्पादकतेत वाढ तसेच शाखा व इतर भौतिक सुविधा विवेकीपणे उभारणे यावर असेल. या उपायांमुळे खर्च-उत्पन्न गुणोत्तर सुमारे ५५ टक्क्यांपर्यंत आणता येईल. कर्जमंजुरी प्रक्रिया व वसुली यंत्रणा यांच्या सहाय्याने वित्त वर्ष २०३० पर्यंत मालमत्तेवरील परतावा (आरओए) १.८ ते २.० टक्के आणि भागभांडवलावरील परतावा (आरओई) १६ ते १८ टक्के येथपर्यंत नेण्याचे बॅंकेचे उद्दिष्ट आहे.
भांडवली स्थिती : वित्त वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीअखेर २२.८ टक्के इतक्या भांडवली पर्याप्तता गुणोत्तराने आणि २१.२ टक्क्यांच्या प्रथम स्तर भांडवलाने उज्जीवन बॅंकेची भांडवली स्थिती सक्षम आहे. मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित तारणाधारित कर्जांचा वाढता वाटा जोखमींचा भार कमी करतो. त्यामुळे भांडवलाचा कार्यक्षम वापर होतो आणि तातडीने भांडवल उभारणीची आवश्यकता न राहता दीर्घकालीन वाढीसाठी भक्कम आधार मिळतो.
बँकेच्या या प्रवासाविषयी बोलताना उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल म्हणाले, “आर्थिक वर्ष २०३०पर्यंत १ लाख कोटी रुपयांच्या कर्जपुस्तकाचे उद्दिष्ट आमच्या समोर आहे. स्मॉल फायनान्स बँक म्हणून प्रवास सुरू केल्यापासून उभारलेल्या पायावर हे उद्दिष्ट आधारित आहे. या काळात आमचे एकूण कर्जपुस्तक आर्थिक वर्ष २०१७ मधील ७,५६० कोटींवरून आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीअखेर ३३,२८७ कोटींवर पोहोचले आहे. आमच्या शाखांचे जाळे ७५२ वरून सुमारे १,१५० पर्यंत वाढवणे, सुरक्षित तारणाधारित कर्जांचा वाटा ६५ ते ७० टक्क्यांवर नेणे ठेवींमधील कासाचा हिस्सा ३५ टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि शाखांची उत्पादकता दुप्पट करणे हे आमच्या धोरणांचे उद्दिष्ट आहे. आमची वार्षिक कर्जवाढ २० ते २५ टक्क्यांदरम्यान राहील, अशी अपेक्षा आहे. त्यायोगे आर्थिक वर्ष २०३० पर्यंतभागभांडवलावरील परतावा १६ ते १८ टक्के आणि मालमत्तेवरील परतावा १.८ ते २.० टक्के इतका साध्य करता येईल. आज आमच्याकडे २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९७ लाखांहून अधिक विविधतापूर्ण आणि वाढता ग्राहकवर्ग आहे. हा व्यापक ग्राहकवर्ग, प्रगतीकांक्षी वर्ग आणि नवश्रीमंत वर्ग यांवर लक्ष केंद्रित ठेवून उद्दिष्टे पूर्ण करण्याची आमची ठोस क्षमता आहे.”